

कासा : पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच डहाणू तालुक्यातील एका पन्नाशीतील व्यक्ती मासेमारीसाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल जान्या केदार (वय ५५) रा. पेठ, डहाणू येथील रहिवासी आहेत. गावालगतून वाहणाऱ्या सूर्या नदीत पावसाळ्याच्या सुरुवातीला वलगणीचे मासे मोठ्या प्रमाणात वरच्या भागात चढत असल्याने स्थानिक नागरिक विविध साधनांच्या मदतीने मासेमारीसाठी नदीकाठावर जात असतात. त्याचप्रमाणे विठ्ठल केदार हे देखील मासे पकडण्यासाठी सूर्या नदी परिसरात गेले होते.
मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंतेपोटी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक व ग्रामस्थांनी नदी परिसर, आजूबाजूचा भाग तसेच नदीपात्रात शोधमोहीम राबविली. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांचे पुत्र यांनी येथे धाव घेत आपल्या वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात मनुष्य बेपत्ता क्रमांक १७/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पाऊस आणि नदीतील वाढलेला प्रवाह लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले असून परिसरात कसून तपास सुरू आहे.
बेपत्ता विठ्ठल केदार यांचा रंग सावळा, केस काळे, नाक लांब व सरळ असून ते मराठी भाषा बोलतात. घरातून बाहेर पडताना त्यांनी पांढऱ्या रंगाची अंडरवेअर व त्यावर टॉवेल नेसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेला पूर आणि वाढलेला प्रवाह लक्षात घेता नागरिकांनी जीव धोक्यात घालून मासेमारी अथवा इतर कारणांसाठी नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.