

पालघर : हनिफ शेख
काही दिवसात परिवहन खात्याकडून राज्याला राजमाता जिजाऊंच्या नावाने नवीन 3 हजार बसेस उपलब्ध होणार असून त्यातील तब्बल 200 नवीन बसेस या पालघर जिल्ह्यासाठी आम्ही देणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांनी डहाणू या ठिकाणी केली डहाणू नगरपरिषदेकडून आयोजित डहाणू फेस्टिवलच्या उद्घाटन समयी ते बोलत होते. यावेळी डहाणू बीचसाठी देखील पर्यटन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा, अशी मागणी येथील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आहे.त्या संदर्भात पर्यटन मंत्री शंभूराजे यांच्याशी देखील बैठक झाली असून लवकरच मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल असेही आश्वासन सरनाईक यांनी यावेळी दिले. तर डहाणू येथून देखील लांब पल्ल््याच्या बसेस जात असल्याने या ठिकाणी देखील डहाणू आगारासाठी अधिकच्या बसेस द्यावे,अशी मागणी झाल्याने या 200 मधील तब्बल 25 बसेस या डहाणूसाठी देणार असल्याचे देखील यावेळी सरनाईक यांनी सांगितले.
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डहाणू नगरपरिषदेकडून डहाणू फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी उद्घाटक म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्वप्रथम डहाणू बस आगाराची पाहणी केली.आणि येथील भौतिक सुविधा स्वच्छता याची प्रशंसा देखील त्यांनी यावेळी केली. येत्या काही दिवसात राज्यातील काही मोजक्या बस स्थानकांना सर्व सुख सोयी युक्त अद्यावत करण्याबाबत परिवहन खाते विचार करत आहे. यामध्ये डहाणूचा देखील आम्ही समावेश करू असेही नाही, यांनी यावेळी सांगितले. डहाणू बीच साठी पर्यटनाच्या दृष्टीने अधिकचा निधी मिळावा अशी मागणी असल्याने 4 कोटी
रुपयांव्यतिरिक्त अजून काही डहाणूसाठी देता येईल का? यासाठी देखील मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले पालघर जिल्ह्यावर विशेष करून स्वर्गीय आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील विशेष प्रेम असल्याचा उल्लेख यावेळी सरनाईक यांनी केला.
सरनाईक यांच्या नवीन बसेस बाबतच्या घोषणेने पालघर जिल्ह्यातील परिवहन सेवा अधिक सक्षम होण्याची चिन्हे आहेत. कारण की सध्या जिल्ह्यातील परिवहन सेवा पहाता अनेक बसेस भंगार अवस्थेत दिसून येतात. याशिवाय कधीही कुठेही अचानक बिघाड होण्याच्या घटनेत देखील वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे सरनाईक यांच्या या घोषणेने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यावेळी आमदार राजेंद्र गावित आमदार विनोद निकोले माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सुनील भुसारा, जिल्हाधिकारी
डॉ.इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, डहाणू नगराध्यक्ष राजू माच्छी, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम घरत गटनेते तन्मय बारी, नगरसेवक वरून पारेख, नगरसेवक मिहिर शहा, नगरसेवक किर्ती मेहता आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर परिषदेने आयोजित केलेल्या या डहाणू फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले विशेष म्हणजे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि भाजपाचे सर्व नगरसेवक गैरहजर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या या फेस्टिवल बाबत सुरुवातीला अनेक मतांतरे होती. मात्र हा फेस्टिवल होणारच असे
शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नगराध्यक्षांकडून सांगण्यात देखील आले होते. यामुळे या फेस्टिवलाच्या आयोजनाच्या बाबतीत नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांचे एकमत नसल्याचे यातून दिसून आले. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक असताना उद्घाटनाला प्रताप सरनाईक आल्याने याबाबत देखील अनेक चर्चा या ठिकाणी रंगल्या होत्या. यामुळे या नगर परिषदेच्या फेस्टिवलला पक्षीय वादाची किनार आहे काय, असाही सवाल आता उपस्थित होत असून भाजपाच्या नाईकांना पर्याय म्हणून शिवसेनेचे सरनाईक उपस्थित राहिले होते का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी डहाणू आगाराची पाहणी केली. यानंतर यांनी बोलताना सांगितले की मी अनेक बसेस आगारांना भेटी देतो मात्र अशावेळी अनेकदा मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असुविधा दिसून येतात. मात्र डहाणू येथील आगारात त्यातल्या त्यात बरी परिस्थिती असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. यामुळे जर डहाणू आगाराची परिस्थिती जरा बरी असल्याची सरनाईक सांगतानाच राज्यातील आगाराच्या दुरावस्थेबद्दलची त्यांची नाराजी यातून व्यक्त झाली. यामुळे आपल्या खात्यातील अस्वच्छेते बाबत त्याच खात्याचे मंत्री दूषणं देत असतील तर राज्यातील बस स्थानके आणि आगार चकाचक होणार कधी, याचे उत्तर कोणाकडून घ्यावे, हा ही एक प्रश्न आहे.