

विजय देसाई
नालासोपारा ः नालासोपाऱ्यातील एका नामांकित बेकरीतून पुरवठा होणाऱ्या पावामध्ये थेट किडा (कानेटी) आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नालासोपारा येथील उबाठा शिवसेनेच्या शहर संघटक संगीता मालुसरे यांनी एम.डी. नगर परिसरातील एका दुकानातून नेहमीप्रमाणे पाव खरेदी केला होता. हा पाव त्यांनी सकाळी आपल्या मुलाला खाण्यास दिला असता, त्यातील एका पावामध्ये जिवंत किडा आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच मालुसरे यांनी तात्काळ दुकानदाराला याची माहिती दिली.या घटनेनंतर संबंधित दुकानदाराला सोबत घेऊन संगीता मालुसरे थेट संतोष भुवन येथे ज्या बेकरीतून पावाचा पुरवठा केला जातो त्या एन.एच. बेकरीत पोहोचल्या. मात्र तिथे दिसलेले चित्र अधिकच धक्कादायक होते. बेकरीत ठेवलेल्या पिठामध्ये अळ्या आढळून आल्या, तर संपूर्ण बेकरी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले होते. स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या प्रकारामुळे वसई-विरार परिसरातील अनेक बेकऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या रोजच्या अन्नाशी संबंधित असलेल्या बेकऱ्यांकडे अन्न व औषध प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारंवार तक्रारी होऊनही ठोस कारवाई का केली जात नाही, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात बेकरीचे मॅनेजर यांनी बेकरीकडून झालेली चूक मान्य केली असून पुढील कारवाईसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र केवळ कबुलीपुरते न थांबता संबंधित बेकरीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यां संगीता मालुसरे यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या अशा बेकऱ्यांवर एफडीए ने तातडीने छापे टाकून कठोर पावले उचलावीत, अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आता या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन काय भूमिका घेते आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण नालासोपाऱ्याचे लक्ष लागले आहे.