

वसई : वसईत पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. 2007 साली ही घटना घडली होती. या हत्येच्या आरोपीला तब्बल अठरा वर्षांनंतर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. नंदू रामदास विश्वकर्मा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
2007 साली सातीवली येेथे राहणाऱ्या 5 वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या करून तो फरार झाला होता. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपी नंदलाल उर्फ नंदु रामदास विश्वकर्मा याच्याविरुद्ध 1 एप्रिल 2007 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो आरोपी तेव्हापासून फरार होता. पोलीस आयुक्तालयात घडलेल्या व उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते.
या गुन्ह्याचा गुन्हे शाखा दोनने नव्याने समांतर तपास करुन त्यावेळी हजर असलेले घटनास्थळावरील साक्षीदार यांच्या मदतीने आरोपीचा तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान आरोपी उत्तर प्रदेश येथील मूळ गावी राहत असून वास्तव्य लपवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मिळालेल्या माहीतीच्या आधारे व कौशल्यपूर्ण तपासाद्वारे उत्तरप्रदेशच्या ईटावा तालुक्यातील खरदौरी येथून आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, आदींच्या पथकाने केली आहे.