Palghar Snake Awareness | मोखाड्यातील आदिवासी वसतिगृहांमध्ये सर्प सजगता अभियान

स्पार्क फाउंडेशनतर्फे आदिवासी वसतिगृहांमध्ये सर्प सजगता अभियान
Mokhada Snake Awareness Campaign
मोखाडा तालुक्यात स्पार्क फाउंडेशनतर्फे आदिवासी वसतिगृहांमध्ये सर्प सजगता अभियान राबवण्यात आलेPudhari
Published on
Updated on

Mokhada Snake Awareness Campaign

खोडाळा : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेने राज्यभरातील आदिवासी वसतिगृहे व आश्रमशाळांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल मोखाडा तालुक्यात स्पार्क फाउंडेशनतर्फे आदिवासी वसतिगृहांमध्ये सर्प सजगता अभियान राबवण्यात येत आहे.

स्पार्क फाऊंडेशन मोखाडा तालुक्यात सातत्याने नाविण्यपूर्ण आणि शैक्षणिकदृष्ट्या उपक्रमशील अभियान राबविण्यात पुढाकार घेत असल्याने तालुक्यातील शैक्षणिक वाटचाल सुलभ होत असल्याची लोकभावना आहे.

Mokhada Snake Awareness Campaign
Palghar news: हॉस्पिटलमध्ये मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दणका, शिंदेसेनेतून निलंबन

मोखाडा तालुक्यासाठी हे अभियान विशेष महत्त्वाचे ठरत असून घनदाट जंगल, डोंगराळ भूभाग, मुसळधार पावसाळा आणि अनेक पाड्यांतील कच्ची घरे, उघडी शौचालये व अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे पावसाळ्यात सर्पांचा वावर वाढतो. यापूर्वी मोखाडा तालुक्यातील बोरीची वाडी येथे सर्पदंशामुळे सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

तसेच ग्रामीण भागात सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असतानाही नातेवाईकांकडून मांत्रिकाकरवी मंत्रोच्चाराचा घाट घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ज्यातून अंधश्रद्धेचे खोलवर रुजलेले मूळ दिसून येते.

Mokhada Snake Awareness Campaign
Palghar Hospital: पालघरमध्ये जखमी गोविंदाच्या उपचारावरून शिवसैनिकांचा गोंधळ; रुग्णालयीन कर्मचाऱ्याला मारहाण

दुसरीकडे मोखाड्यातील आरोग्य यंत्रणेची स्थितीही चिंताजनक आहे. डॉक्टरांअभावी सर्पदंशासारख्या तातडीच्या रुग्णांना थेट जव्हार किंवा नाशिकला हलवावे लागत असल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत सर्पदंशानंतरचा 'गोल्डन अवर' वाचवण्यासाठी प्रतिबंध आणि प्रथमोपचाराचे ज्ञान हेच विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रभावी संरक्षण ठरू शकते, या भूमिकेतून 'प्रतिबंध हाच उत्तम उपाय' या तत्त्वावर हे अभियान हाती घेण्यात आले आहे.आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा नव्या पिढीला होताना दिसत आहे.

या अभियाना अंतर्गत सापांविषयी सखोल व शास्त्रीय माहिती देण्यात येत आहे. यामध्ये सर्पांचे वर्गीकरण, विषारी-बिनविषारी सर्प ओळखण्याच्या खुणा व पद्धती, नाग, मण्यार, घोणस, फुरसे या महाराष्ट्रातील प्रमुख विषारी सापांची ओळख, सर्पदंश टाळण्यासाठी झोपताना मच्छरदाणी व उंच खाटेचा वापर, रात्री टॉर्चचा वापर, घराभोवती स्वच्छता, पालापाचोळा व दगडविटांचे ढिगारे न ठेवणे, यांसारखी घ्यावयाची काळजी, साप दिसल्यास न घाबरता सुरक्षित अंतर राखणे व सर्पमित्राशी संपर्क साधणे, तसेच सर्पदंश झाल्यास जखमेवर कापणे-चोखणे, आवळपट्टी बांधणे यांसारखे चुकीचे उपाय न करता तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल होणे, या विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

काही विषारी सर्पांचे विष मज्जासंस्थेवर आघात करते, तर काहींचे विष रक्ताभिसरण व श्वसन संस्थेवर परिणाम करते. त्यानुसार लक्षणे व प्रथमोपचाराची पद्धत बदलते, ही महत्त्वाची माहिती छायाचित्रे, चित्रफिती व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील सर्पांविषयीच्या शंका, गैरसमजुती व अंधश्रद्धांचेही निरसन करण्यात येत आहे.

Mokhada Snake Awareness Campaign
Palghar ST Special Buses: गणेशोत्सवादरम्यान पालघर विभागातून कोकणासाठी ५९५ बसेसचे नियोजन

आतापर्यंत वाकडपाडा, तळेची वाडी, खोडाळा, जांभा पाडा आदी वसतिगृहांमध्ये सदर अभियान राबवण्यात आले असून, विद्यार्थ्यांमधील भीती व असुरक्षिततेची भावना कमी होऊन सजगता वाढताना दिसत आहे. वसतिगृहांनंतर आवश्यकता भासल्यास शाळांमध्येही या अभियानाचा विस्तार करण्यात येणार आहे.

स्पार्क फाउंडेशनचे शिक्षण सहाय्यक प्रसाद शेळके हे राजेवाडी येथील अनुभवी सर्पमित्र दत्तात्रय ठोंबरे यांच्या सहकार्याने हे अभियान राबवत असून, वाकडपाडा वसतिगृहाचे अधीक्षक चुनीलाल पवार, खोडाळा वसतिगृह अधीक्षक भूपेंद्र लांडगे, जांभा पाडा वसतिगृह अधीक्षिका कामडी मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. स्पार्क फाउंडेशनच्या या औचित्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विविध सर्प व त्यांच्या हालचालींविषयी महत्त्वपूर्ण माहिती मुलांना मिळाली, त्यामुळे वसतिगृहातील भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे.

चुनीलाल पवार, अधीक्षक, वाकडपाडा वसतिगृह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news