

पालघर ः पालघर मनोर महामार्गावर सज्जन पाड्याच्या हद्दीतील खड्ड्यांमुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला आहे. दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी अनिता पाटील (47) (रा. नावझे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालघर सिन्नर महामार्गाची देखभाल दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याच्या कामातील दिरंगाईमुळे महिलेचा बळी गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पालघर सिन्नर महामार्गाच्या दुरावस्थे विरोधात कुणबी सेना आक्रमक झाली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पालघर तालुक्यातील नावझे गावातील अनिल पाटील त्यांच्या पत्नी अनिता यांच्या सोबत सायंकाळी दुचाकीवरुन पालघर वरून नावझेच्या दिशेने निघाले होते.पालघर मनोर महामार्गा वरील सज्जन पाड्याच्या हद्दीत पोहोचले असताना जीवघेण्या खड्ड्यात दुचाकी आदळुन अपघात झाला होता.अपघातात अनिता पाटील यांच्या डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. पालघर सिन्नर महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेले महामार्ग विभागाचे अभियंते आणि कंत्राटदाराने खड्डे बुजवण्याच्या कामात दुर्लक्ष केल्याने अपघात होऊन अनिता पाटील यांचा मृत्यू झाला.
महामार्ग विभागाचे अभियंते आणि ठेकेदारा विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. पालघर सिन्नर महामार्गाच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील हद्दीतील पालघर ते तोरंगण घाटा पर्यंतच्या सुमारे 107 किलोमीटर लांबीच्या महामार्गा पैकी 84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी एका कंपनीला बारा कोटीचे कंत्राट देण्यात आले होते.
पालघर सिन्नर महामार्ग घोषित होऊन सहा ते वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही महामार्गा नुसार असलेल्या सुविधा उपलब्ध करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाला अपयश आले आहे. पावसामुळे महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाकडे ठेकेदारा कडून दुर्लक्ष केले जात आहे.बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे.