

तलासरी : तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमात एक निर्दयी प्रकार समोर आला आहे. शौचालय व बाथरूमची साफसफाई नीट केली नाही म्हणून 12 विद्यार्थ्यांना काठीने जबर मारहाण करण्यात आली.ही निरागस मुले व्हिवळत रडत असतांना देखिल काठीचा मार सुरूच राहिल्याने या मुलांच्या पायावर तिव्र वळ उठले आहे. विद्यार्थांना मारहाण करणारा हा तिथेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकणारा असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
तलासरी तालुक्यात असलेल्या वनवासी कल्याण आश्रम येथे वसतिगृहात राहणार्या आठवीतील 12 विद्यार्थ्यांना शौचालय व बाथरूमची साफसफाई नीट केली नाही म्हणून लाकडी काठीने गंभीर मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात मारहाण करणार्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर मारहाण करणारा विद्यार्थी हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत आहे. त्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास तलासरी पोलीस करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तलासरी पाटकरपाडा येथे वनवासी कल्याण आश्रम आणि समाजकल्याण मार्फत वस्तीगृह चालविले जात असून परिसरातील आदिवासी विद्यार्थी या वसतिगृहात राहून विविध शाळांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. मंगळवारी वसतीगृहात विद्यार्थ्यावर देखरेखीसाठी ठेवलेल्या विद्यार्थ्यांनी वस्तीगृहातील इयत्ता आठवीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शौचालय व बाथरूम साफसफाई करण्याचे दैनंदिन काम देण्यात आले होते.
आठवीतील विद्यार्थ्यांनी साफसफाई देखील करून घेतली होती मात्र पुन्हा शौचालय वापरात आल्याने घाण झाले होते. साफसफाई नीट केली नाही याचा ठपका ठेवून या विद्यार्थ्यांवर देखरेखी साठी ठेवलेल्या आयआयटी मधील विद्यार्थ्यांने रागात येऊन वसतिगृहातील एकूण 12 विद्यार्थ्यांना लाकडी काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली कुणाच्या पायावर तर कुणाच्या हातावर काठीने जबर मारहाण केल्याने वळ उठले होते. तर काहींना पायाच्या पोटरीवर मारल्याने पाय सुजल्याने चालता ही येईना इथवर मारहाण झाल्याने बारा विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करण्याची वेळ वनवासी कल्याण आश्रम प्रशासनावर आली.
पाल्याची अवस्था पाहून पालकांना रडू कोसळले
मारहाण इतकी जबर होती की अनेक पालकांना आपल्या पाल्याची अवस्था पाहून रडू कोसळले आणि थेट त्यांनी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विद्यार्थ्या विरुद्ध गुन्हा नोंदवत अधीक्षकावर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर आम्ही पाल्यांना शिक्षणासाठी सोय व्हावी यासाठी वसतिगृहात पाठवतो की मार खाण्यासाठी असा प्रश्न उपस्थित करीत घटना घडली.तेव्हा अधीक्षक आणि आश्रम प्रशासन कुठे होते याची चौकशी करून त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
प्रकार दडपण्याचा आश्रम प्रशासनाचा प्रयत्न
मारहाण होत असताना मारहाण झालेल्या एका विद्यार्थ्यांची आई वसतीगृहात आली असताना तिने विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे पाहिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना स्वच्छता साफसफाई नीट केली नाही म्हणून अनेक वेळा मारहाण झाल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. वनवासी कल्याण आश्रमात अधीक्षक असताना विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यानंतर आश्रम प्रशासनाने सदर प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा पालकांनी आरोप केला.