

खानिवडे : महिलांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत देशभरातील १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी 'ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस' (एचपीव्ही) लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेअंतर्गत 'गार्डासिल' ही लस पात्र मुलींना मोफत देण्यात येत असून, ती एकाच डोसच्या स्वरूपात दिली जाणार आहे. या मोहिमेची पालघर जिल्ह्यातील सुरुवात वसई तालुक्यातून करण्यात आली असून वसईच्या ग्रामीण भागातील भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या दिवशी लसीकरण कार्यक्रम पार पडला.
या मोहिमेअंतर्गत प्रतिभा विद्यामंदिर, खानिवडे येथील कस्तुरी योगेश भोईर ही विद्यार्थिनी पालघर जिल्ह्यात एचपीव्ही प्रतिबंधक 'गाडांसिल' लस घेणारी पहिली मुलगी ठरली आहे. विशेष म्हणजे कस्तुरी ही दिव्यांग असूनही अत्यंत धाडसी, निडर आणि जिद्दी स्वभावाची विद्यार्थिनी आहे. शारीरिक अडचणींवर मात करत ती अभ्यासाबरोबरच खेळ व विविध उपक्रमांमध्येही आपली गुणवत्ता सिद्ध करत असल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या या पुढाकारामुळे इतर मुलीमध्येही लसीकरणाबाबत सकारात्मक संदेश गेला आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या मोहिमेअंतर्गत टप्प्याटप्प्याने पालघर जिल्ह्यातील सुमारे १४ वर्षे वयोगटातील जवळपास १७ हजार मुलींना एचप ीव्ही प्रतिबंधक लसीचा लाभ देण्यात येणार आहे. या माध्यमातून भविष्यात महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा शासनाचा उद्देश आहे.
सोमवारी भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्ह्यातील पहिली लस देताना वसई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद रामचंद्र दुधाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा मुळीक, डॉ. पौरस म्हात्रे यांच्यासह भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींना व पालकांना या लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा क्रमांक दुसरा लागतो. दरवर्षी हजारो महिला या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. मात्र योग्य वयात लसीकरण आणि नियमित तपासणी केल्यास हा कर्करोग मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. एचपीव्ही लसीकरणामुळे सुमारे ८५ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मुलींसाठी ही लस अत्यंत महत्त्वाची असून पालकांनी याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.