

बोईसर : मनोर टाकवहाळ परिसरातील पाण्याने भरलेल्या दगड खाणीत दोन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बंदावस्थेत पडलेल्या दगड खाणींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बोईसर पूर्व परिसरातील दगड खाणी व अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने कडक भूमिका घेतली असून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
शासनाच्या परिपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासनाने वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी कठोर निर्देश दिले आहेत. त्यानुसार दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी बोईसर मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेत गुंदले सजाचे तलाठी अभिषेक पाटील यांच्यासह महसूल विभागाचे पथक सक्रिय झाले असून बोईसर पूर्व भागातील बंद पडलेल्या दगड खाणी, अवैध उत्खनन तसेच अनधिकृत खनिज वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. परिसरात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी संबंधित विभागांनी कंवर कसली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी बंदावस्थेत असलेल्या दगड खाणींमध्ये पावसाचे पाणी साचून मोठे तलाव तयार झाले आहेत. अशा धोकादायक खाणींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाने या खाणींची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे.
मनोर-टाकवहाळ येथील दुर्घटनेनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अवैध उत्खनन आणि धोकादायक खाणींवर कठोर पावले उचलण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे.