Palghar News | धामटणे कातकरी पाड्यातील सिमेंट रस्त्याला पाच महिन्यांतच तडे

रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप
Kasa Dhamatane Katkari Pada Cement Road Cracks
रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप Pudhari
Published on
Updated on

Kasa Dhamatane Katkari Pada Cement Road Cracks

कासा : तवा ग्रामपंचायत हद्दीतील धामटणे कातकरी पाडा येथे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सुमारे १० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अवघ्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी हा सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात आला होता. कामाच्या ठिकाणी उभारलेल्या फलकानुसार या कामासाठी सुमारे १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांतच रस्त्याच्या विविध भागांत मोठमोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे.

Kasa Dhamatane Katkari Pada Cement Road Cracks
Palghar Hit and Run: मोखाड्यात 'हिट अँड रन'ची घटना; दुचाकीस्वाराचा मृत्यू

स्थळावरील परिस्थिती पाहता रस्त्याच्या मध्यभागी तसेच कडेला लांबच लांब तडे दिसून येत आहेत. काही ठिकाणी काँक्रीटचा थर उखडण्यास सुरुवात झाल्याचाही दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असून, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील विकासकामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, काही ठिकाणी संबंधित यंत्रणा, ठेकेदार आणि देखरेख व्यवस्थेतील त्रुटींमुळे कामांचा दर्जा घसरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. रस्ता तयार झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला तडे जाणे ही बाब कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Kasa Dhamatane Katkari Pada Cement Road Cracks
Palghar News | चाबके-तलावली अनुदानित आश्रम शाळेची मान्यता रद्द : पालकांनी मुलांसाठी नवीन प्रवेश न घेण्याचे आवाहन

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी धामटणे कातकरी पाड्यातील नागरिकांनी केली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचा रस्ता पुन्हा नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने बांधून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित बांधकाम विभागाने आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या तड्यांमागील कारणांचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या विकासकामांची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news