

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील स्मशानभूमीजवळ मंगळवारी झालेल्या हिट अँड रन अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या कारचालकाला मोखाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसारा बाजूकडून येणारी विंडसर कार (क्र. एमएच १५ केयू ५७०२) ही खोडाळा स्मशानभूमीजवळ भरधाव वेगाने जात असताना खोडाळा येथून कारेगाव-पांचघरकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक आत्माराम अशोक येडे (वय २१, रा. वावळ्याची वाडी, करोळ) याचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीवर मागे बसलेले संतोष पांडुरंग बोढारे (वय ३५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून मोखाड्याकडे पसार झाला. मात्र, खोडाळा पोलिसांनी तत्परता दाखवत मोखाडा पोलिस ठाण्याला तात्काळ माहिती दिली. त्यानुसार मोखाडा चौफुली परिसरात संबंधित कार अडवून चालकाला ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम येडे आणि संतोष बोढारे हे एका नातेवाईकाच्या बेपत्ता होण्याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी खोडाळा पोलिस ठाण्यात आले होते. तक्रार नोंदवून परत आपल्या गावी जात असताना खोडाळा स्मशानभूमीजवळील उताराच्या वळणावर हा अपघात घडला. या प्रकरणी मोखाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.