

जव्हार : जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांअंतर्गत येणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा, चाबके-तलावली ह्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक आयुक्त यांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्याचे प्रकल्प अधिका-यांनी सांगितले, त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा ह्या चाबके तलावली आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेऊ नये तसेच सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या समायोजन प्रक्रियेस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर (IAS) यांनी सांगितलं.
अनुदानित चाबके तलावली आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, ह्या शाळेमध्ये इयत्ता १ ली १० वीपर्यंत मुले, मुली एकूण 500 च्या आसपास विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत, मात्र ह्या चाबके तलावली अनुदानित आश्रम शाळेत अनेक अडचणी, समस्या असून आवश्यक शिक्षक व कर्मचाऱ्यांची कमतरता, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक व निवासी सुविधांचा अभाव तसेच शाळेबाबत प्राप्त झालेल्या विविध तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ.अपूर्वा बासुर (IAS) यांनी सांगितले आहे, तसेच मान्यता रद्द झाल्यानंतर ह्या अनुदानित आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जव्हार व डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जवळच्या मान्यताप्राप्त आश्रमशाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही सुरू असून पालकांनी या प्रक्रियेस सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक आयुक्त यांच्या आदेश क्रमांक जा.क्र. अनुआशा-२०२५/प्र.क्र.७७/का.७(२)/१८६१, दि. ०९ मार्च २०२६ अन्वये सदर प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी वारंवार सूचना देऊनही संबंधित संस्थेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्याचा विचार करून तातडीने समायोजन प्रक्रियेत सहभागी व्हावे. सदर प्रकरणाबाबत विविध अफवा व चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पालकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासन व प्रशासनाकडून अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या माहितीलाच ग्राह्य धरावे. शासनाचा विद्यमान आदेश अंतिम निर्णय होईपर्यंत लागू व प्रभावी आहे.
दरम्यान, या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दि. १० जून २०२६ रोजी सुनावणी झाली असून त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत मान्यता रद्द करण्याचा विद्यमान आदेश लागू आल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाबके तलावली अनुदानित आश्रम शाळेत पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अथवा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, भोपोली, विक्रमगड येथे संपर्क साधावा व आपल्या पाल्याचा प्रवेश तातडीने निश्चित करावा, असे आवाहन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर (IAS) यांनी केले आहे, तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देऊन त्यांचे प्रवेश मान्यताप्राप्त आश्रमशाळांमध्ये निश्चित करावेत, शाळेत कोणताही नवीन प्रवेश घेऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.