

नीती मेहेंदळे
लातूर जिल्हा इतिहास आणि पुरातत्व यांनी खच्चून भरलेला आहे. औसा हे असंच एक त्यातलं प्रसिद्ध शहर. ते प्रसिद्ध आहे ते तिथल्या भुईकोट किल्ल्यासाठी. औसा शहराच्या दक्षिणेस 5.52 हेक्टर परिसरात वसलेला, भुईकोट किल्ला 1466 मध्ये बांधला होता. हा किल्ला सखल भागात असल्याने, जवळ गेल्याशिवाय तो दिसत नाही. किल्ल्यामध्ये लोखंडी दरवाजा, राणी महाल, लाल महाल, पाणी महाल, परी बावडी, कटोरा बावडी आणि चांद बावडी अशी महत्वाची बांधकामं दिसतात. कालांतराने हा किल्ला यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे, मुघल आणि ब्रिटिशांच्या ताब्यात होता. हे शहर स्वतःच ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर व औसा हे दोन सुंदर भूईकोट किल्ले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे किल्ले निजामाच्या संस्थानात असल्यामुळे नांदत होते. संस्थानाची सरकारी कार्यालये या किल्ल्यात असल्याने या किल्ल्यावरील बहुतेक इमारतींचा वापर बदलला तरी त्या शाबूत आहेत. तसेच हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्यांनी डागडुजी केल्याने किल्ल्यांची शान अजूनही टिकून आहे.
भूईकोट किल्ल्याची सर्व वैशिष्ट्ये या किल्ल्यामध्ये पाहायला मिळतात. औसा किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात मोर अधिक प्रमाणावर दिसतात. किल्ला परिसरात अनेक मोर आहेत. औसा किल्ल्याबरोबर खरोसा येथील लेणी, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर व उद्गीरचा किल्ला ही स्थळं देखील महत्वाची आहेत.
औसाचा इतिहास चालू होतो तो पैठण प्रतिष्ठान होतं तेव्हापासून. प्रतिष्ठाण (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या औसा गावाची बाजारपेठ भरभराटीस आली. पुढील काळात या भागावर वर्चस्व असणाऱ्या चालुक्यांची राजधानी बदामी येथे होती, त्यांच्या काळात हा किल्ला बांधला असावा. त्यानंतर राष्टकुट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती. चालुक्य राजा विक्रमादित्यच्या शके 1150 च्या बोरगाव येथील ताम्रपटात औसा किल्ल्यात उल्लेख आढळतो.
यादवांचा शेवट झाल्यावर बहामनी काळात औसा किल्ल्याला महत्व आले. बहामनी घराण्याचा 9 वा राजा महमदशहा बहामनी याने 1422 मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. बहामनीने इ.स.1492 मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागीर म्हणून दिले. इ.स.1526 मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन 5 शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. म्हणजे औसा किल्ल्याने बरीदशाहीदेखील पाहिली आहे. बिदर राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परिघात आदिलशाही विरुद्ध अनेक लढाया झाल्या.
औसा गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या लोहबंदी दरवाजापर्यंत जाऊ शकतो. औसा गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी 40 फूट खोल व 20 फूट रुंद खंदक खोदलेला आहे. हा खंदक दोनही बाजूनी बांधून काढलेला आहे. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशद्वारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युद्ध प्रसंगी उचलून घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर खंदकात सध्या वस्ती आहे व इतर बाजूच्या खंदकात सध्या शेती केली जाते आहे.
औसा किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. याला चिलखती तटबंदी म्हणतात. बाहेरील तटबंदीची उंची 70 फूट असून त्यात 12 बुरूज आहेत. बाहेरील तटबंदीवर 2 फूट रुंद व 3 फूट उंच चऱ्या आहेत. आतील तटबंदी 100 फूट उंच असून त्यात 12 बुरुज आहेत. चऱ्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. खंदक ओलांडून जातांना खंदकात पायऱ्या असलेल्या दोन विहिरी आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे 4 दरवाजे आहेत.
किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत असलेल्या पूर्वाभिमूख मुख्य प्रवेशद्वाराला ‘नौबत दरवाजा’ म्हणून ओळखतात. हा दरवाजा लाकडाचा असून त्यावर अणकुचीदार खिळे बसवलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूंना दोन भव्य बुरूज आहेत.
दुसरा दरवाजाही पूर्वाभिमूख असून या प्रवेशद्वाराला ‘अरीतखान दरवाजा’ म्हणून ओळखतात. या दरवाजावर रांगेत चालणाऱ्या हत्तींची शिल्पपट्टी बसवलेली आहे. या प्रवेशद्वारावर दोन छोटे मिनार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या दरवाजांमध्ये देवड्या व कचेरी आहे. या ठिकाणी उजव्या हाताला असलेल्या देवड्यांच्या कमानीवर 3 ओळींचा एक मराठीत शिलालेख आहे.
तिसरा दरवाजा हा बाहेरील तटबंदीतील (पडकोटातील) शेवटचा दरवाजा आहे. या दरवाजाला “चिनी दरवाजा” म्हणून ओळखतात. या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला पडकोटाच्या तटबंदी लगत व मुख्य किल्ल्याच्या तटबंदीलगत प्रत्येकी 4 तोफा ठेवलेल्या आहेत.
तिसरा दरवाजा ओलांडून किल्ल्याच्या दोन तटबंदींच्या मधील जागेत आल्यावर किल्ल्यात न जाता डाव्या बाजूस गेलं की तटबंदीला लागूनच किल्लेदाराचा वाडा आहे. हा वाडा ओलांडून गेल्यावर पुढे पडकोटाच्या मोठ्या बुरुजात अर्धचंद्राकृती चांद विहीर आहे. तसेच आणखी पुढे गेल्यावर पडकोटच्या टोकाच्या बुरुजात गोलाकार तवा विहीर आहे. या विहिरी पाहून किल्ल्याच्या चौथ्या दरवाजाकडे आल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूस पिराचे थडगे पाहायला मिळते. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर तीन बाजूंनी ओवऱ्या दिसतात.
सध्या इथे तहसील कार्यालय आहे. यात उजव्या बाजूच्या ओवरीत अनेक तोफगोळे रचून ठेवलेले आहेत. या ओवऱ्यांच्या मागे मशीद व त्यासमोर हौद आहे. ओवऱ्यांचा आकार पूर्वीच्या काळी चौरसाकृती होता व त्यात दक्षिणेला बाहेर पडण्यासाठी दरवाजा होता, तो घड्याळ दरवाजा या नावाने ओळखला जातो. या दरवाजाची आता फक्त तुटकी कमान उरलेली आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोर सिमेंटची पक्की पायवाट दिसते, पण तिथे न जाता डाव्या बाजूला असलेल्या जिन्याने तटबंदीवर चढून जावं लागतं. येथे एक 7 फूट 4 इंच लांब व 2 फूट 4 इंच व्यासाची पंचधातूची तोफ आहे. या तोफेवर फारसी भाषेतील शिलालेख आहे व मागच्या बाजूला सूर्यमुख कोरलेलं आहे. अशा बनावटीची तोफ उदगीर किल्ल्यावर पण आहे.
तोफ पाहून सिमेंटच्या पायवाटेने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला दारू कोठाराची इमारत दिसते. उजव्या बाजूला दगडात बांधून काढलेला मोठा चौकोनी तलाव दिसतो. याला “जलमहाल“ या नावाने ओळखतात. या तलावाच्या एका बाजूला आत उतरण्यासाठी जिना आहे. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पाहायला मिळतो. हा महाल बरोबर तलावाच्या खाली येतो.
या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छतात झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या छतात असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात राहाण्यासाठी केला जात असे. जमिनीखाली बांधलेला महाल व वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे. या महालाचा उपयोग खलबतखाना म्हणूनही होत असावा. ही रचना पाहून नळदुर्गाची आठवण येते.
जलमहाल पाहून पुढे गेल्यावर एक मोठी पायऱ्यांची विहीर लागते. या विहिरीला कटोरी विहीर या नावाने ओळखले जाते. या विहिरीसमोरील बुरुजावर एक मोठी तोफ आहे. येथून पुढे तटबंदीवर चढून गड फिरत येतो. तटबंदीवर चढल्यावर पहिल्याच बुरुजावर 2 मोठ्या तोफा पाहायला मिळतात. पुढे एका मोठ्या बुरुजावर 2 तोफा आहेत. त्यातील पंचधातूची तोफ 10 फूट 2 इंच लांब असून त्यावर पोर्तुगीज राजाचा मुकुट कोरलेला आहे. बुरुजावर तोफा फिरवण्यासाठी दगडी आरी बांधलेली आहे. बाजूला तोफा थंड करण्यासाठी पाण्याचा हौद आहे. त्याच्या पुढच्याच बुरुजावर अजून एक 11 फूट 8 इंच लांब व 1 फूट 6 इंच व्यासाची लांबलचक तोफ आहे. पुढे गेल्यावर आपण झेंडा बुरुजापाशी येतो.
या बुरुजावर एक तोफ आहे. झेंडा बुरुजावरून जिन्याने खाली उतरल्यावर आपण तिसऱ्या व चौथ्या प्रवेश द्वाराच्या मध्ये येतो. लातूरच्या पर्यटन स्थळांमध्ये औसा सारख्या भुईकोट किल्ल्यांना आवर्जून भेट द्यायला हवी.