

डॉ. महेश केळुसकर
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील ज्यांना आपले लेखनगुरु मानतात ते र .वा. दिघे हे मराठीतील ग्रेट प्रादेशिक कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या काळात दिघेंची उपेक्षा झाली. पण, शेतकरी कातकरी-आदिवासी बहुजनांच्या सुखदुःखांशी निगडित झालेले र. वा. दिघे आपल्या कादंबऱ्यांमधून वाचकांना अंतर्मुख करत राहिले.
दोन आठवड्यांपूर्वी विश्वास पाटील यांच्याबरोबर आम्ही काही मित्रांनी खोपोली येथील दिघेंचे सुपुत्र वामनराव यांच्या घरी भेट दिली. वामनरावांच्या पत्नी उज्ज्वला दिघे स्वतः चांगल्या साहित्यकार आहेत आणि खोपोली परिसरात गेली अनेक वर्षे साहित्य चळवळीचं कामही करत आहेत. त्यांचा मुलगा व शिक्षिका असलेली सुनबाई यांनी आमचं सर्वांचं खूप अगत्याने स्वागत केलं. विश्वास पाटील यांनी र. वा. दिघे यांच्या कादंबऱ्यांच्या आठवणी जागवत तेथे छोटसं मनोगतही व्यक्त केलं.
लहानपणी शाळेत असताना र. वा. दिघे कविता लिहीत असत. रत्नागिरीला समुद्राच्या खडकावर बसून त्यांनी कविता लिहिल्या. पण, त्यांच्या वडिलांनी त्या फाडून टाकल्या आणि अभ्यास करायला सांगितलं. त्याच कविता र. वा. यांनी पुन्हा आठवत 1972 मध्ये लिहिल्या आणि एक हस्तलिखित काव्यसंग्रह तयार केला. तो संग्रह वामनराव दिघे यांच्याकडे उपलब्ध आहे. 1939 मध्ये दिघेंनी पाणकळा ही पहिली कादंबरी खोपोली येथे लिहून प्रकाशित केली आणि त्यांचा साहित्य प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.
अनेक कादंबऱ्या, कथा, नाटकं, लोकगीतं त्यांच्याकडून लिहिली गेली. त्यांच्या पाच कादंबऱ्यांवर हिंदी व मराठी चित्रपट निघाले. त्या काळात प्रकाशक मिळणे दुरापास्त होते म्हणून दिघे यांनी स्वतःच उल्हासमाला नावाचं प्रकाशन सुरू केलं. स्वतःची पुस्तकं स्वतः छापून पुस्तकांचे गठ्ठे स्वतः मुंबई, पुणे इथे प्रकाशकांकडे दुकानात नेऊन ते वितरित करत असत. लेखन, प्रकाशन, वितरण हा एकहाती उद्योग दिघेंनी अनेक वर्ष केला.
अनेक वर्षांच्या उपेक्षेनंतर दिघेंच्या कादंबऱ्यांची चर्चा समीक्षकांमध्ये आणि वाचकांमध्ये सुरू झाली. पाणकळा आणि सराई या दोन कादंबऱ्या मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. च्या अभ्यासक्रमात होत्या. ‘आई आहे शेतात’ या त्यांच्या कादंबरीचं हिंदीत भाषांतर झालं. माँ खेतो में बसती है... या नावाने हा अनुवाद प्रसिद्ध आहे. 1957-58 मध्ये पनवेल येथे आयोजित केलेल्या कुलाबा जिल्हा साहित्य संमेलनाचे र. वा. दिघे अध्यक्ष होते. 7 मे 1960 रोजी ठाणे येथील मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठीचे शिल्पकार म्हणून त्यांना मानपत्र देण्यात आलं.
जयवंत दळवी यांनी खोपोलीला दिघ्यांच्या घरी जाऊन त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. साहित्यिक गप्पा या दळवींच्या पुस्तकात ही मुलाखत समाविष्ट आहे. र. वा. दिघे हे स्वतः एक प्रगतिशील शेतकरी होते. त्यांना शेतीचे अनेक पुरस्कार मिळालेले होते. खोपोलीला आपल्या स्वतःच्या जागा, जमिनी देऊन त्यांनी कारखाने आणले. त्यासंबंधी पत्रव्यवहार केला. कारखाने आल्यामुळे खोपोली गावातील लोकांना रोजगार मिळाला आणि खोपोलीच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळाली.
1947 मध्ये लोकल बोर्डाकडून प्राथमिक शाळेची मागणी करून त्यांनी नवीन शाळा सुरू केली. त्या शाळेला खोपोली नगरपालिकेने कै. र. वा. दिघे शाळा क्रमांक तीन असं नाव दिलेलं आहे. दिघे हे एक निष्णात कायदेतज्ज्ञ होतेच. पण त्याचबरोबर श्रेष्ठ साहित्यिक, प्रकाशक, शेतीचे अभ्यासक आणि समाजसेवक होते. आपलं लेखन प्रथम बोरूने करण्याची त्यांची सवय होती. त्यानंतर दौत-टाक आणि पुढे शाई पेन वापरून त्यांनी आपलं लिखाण केलं. आपलं सर्व लिखाण त्यांनी घराच्या बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात कधी शेताच्या बांधावर बसून तर कधी विहिरीच्या पुलावर बसून केलं.
र. वा. दिघे यांना संगीताची खूप आवड होती. संगीतातील रागदारी आणि सर्व राग ते ऐकत असत. तसंच त्यांना वाचनालयं कमी पडत असत. अनेक पुस्तकं खरेदी करून ते वाचत. त्यांचं मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होतं तसंच त्याचं मराठीत झालेलं भाषांतर वाचण्याची आवड होती.
खोपोली गाव, घाट आणि कोकण यांचा दुवा सांधणारी बाजाराची उतारपेठ म्हणून ओळखली जाई. कोकणातून पेणचं मीठ, अलिबागची सुकी मासळी, सुधागड तालुक्यातील सागवान, कोळसा, तांदूळ वगैरे माल खोपोली इथून घाटावर रवाना होई. घाटावरून गूळ, मिरची, तेल, कांदे, बटाटे, डाळी, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा वगैरे जिन्नस कोकणात येत. खोपोली हे एक पूर्वीपासून वाटपाचं मोठं केंद्र समजलं जातं. खोपोलीस टाटांचं पॉवर हाऊस सुरू झाल्यापासून लोकवस्तीत वाढ झाली. इंजिनियर्स, ऑपरेटर्स असं मोठ्या दर्जाचं गिऱ्हाईक वाढलं. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची वाढ झाली. कर्जत-खोपोली अशी मालाची डबे असलेली एक मिश्र गाडी आठ महिने चालायची, ती बारा महिन्यांची कायम झाली आणि तिचा वक्तशीरपणा वाढला.
या जुन्या काळाच्या खोपोलीचे वर्णन करताना दिघे म्हणतात, “खोपोलीच्या ओढ्यात पावसाळा संपला की, मे महिन्यात एक थेंब सुद्धा पाणी मिळायचं नाही. तिथे बारमाही इंद्रायणी खेळू लागली. माझे विहारी नावाचे गाव पुढच्या पलीकडील तीरावर आहे. पावसाळ्यात ओढा पार होताना आमची तिरपीट उडायची. पूर आला की, तो ओसरेपर्यंत काठावर तिष्ठत बसावे लागे व मग काही वेळापुरता तरी खोपोलीचा संबंध तुटे. खोपोलीच्या शाळेत जाणाऱ्या मुलांची तर फारच तारांबळ उडायची. डोक्यावर दप्तर घेऊन त्यांना ओढा ओलांडावा लागे. पाणी जास्त असले की, गावातील वडीलधाऱ्या माणसांना त्यांच्या सोबतीला जावे लागे.
पावसाच्या पुरात वरून आलेल्या इंद्रायणीच्या पाण्याची भर पडली तेव्हा पावसाळा संपल्यावर मोठ्या माणसांना सुद्धा ओढा ओलांडणे अशक्य झाले. मग टाटा कंपनीने आम्हाला ओढ्यावर एक सुंदर आणि मजबूत पूल बांधून दिला. पुलामुळे उन्हाळी, पावसाळी, रात्री बे रात्री विहारी-खोपोली रहदारी निर्धास्त झाली. या पुलावर बसले इथून नयन मनोहर देखावा दिसतो. या पुलावर बसून मी माझे कितीतरी लिखाण केले आहे. सराई कादंबरीचा काही भाग याच पुलावर बसून मी लिहिला. गानलुब्धा मृगनयना व रानजाई यांची कथानकं मी याच पुलावर बसून पक्की केली. किती तरी लघुकथांची गुंफण मी इथे बसून केली आहे.
खोपोली नगर परिषदेनं या थोर साहित्यिकाचं आता सुंदर स्मारक केलं आहे. तिथं सुसज्ज ग्रंथालय आणि दिघे यांची ग्रंथसंपदासुद्धा आहे. अनेक साहित्यिक आणि पर्यटक या स्मारकास भेट देत असतात.