Palghar rainfall : पालघर शहर परिसराला पावसाने झोडपले

रेल्वे रुळावर ४ फूट साचले पाणी, जीवनवाहिनी थांबली, प्रवाशांचा कोंडमारा
Palghar rainfall
पालघर शहर परिसराला पावसाने झोडपलेpudhari photo
Published on
Updated on

पालघर शहर : पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून, धरणे ओव्हरफ्लो होवू लागली आहे. दरम्यान पालघर शहर व नगरपरिषद हद्दीत सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पहाटेपासूनच मुसळधार पाऊस बरसल्याने पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचले त्याचप्रमाणे नगरपरिषद अगदी व शहरात अनेक ठिकाणी सखल भागात, घर वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरले, रस्ते देखील जलमय झाले. पालघर शहरात बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला. पालघर शहर व आसपासच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रेल्वे रुळावर पाणी साचल्याचा फटका पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवेवर त्याचप्रमाणे लांब पल्यांच्या रेल्वे गाड्यांवर झाला. लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पालघर ते वैतरणा दरम्यान रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली, यामुळे रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला.

Palghar rainfall
Sambhajinagar Rain : शहरात मुसळधार : ३९ मिमीपेक्षा अधिक पाऊस

पालघर नगरपरिषद हद्दीतील वीरेंद्रनगर, गोवारी पाडा, किरण नगर येथे मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे घरातील अन्नधान्य, साहित्य सामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेविरोधात संताप व्यक्त केला आहे.

बिडको औद्योगिक क्षेत्राच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भरवाडपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गुडघ्याहून वरपर्यंत पाणी साचले. यामुळे नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना गुडघाभर होऊन अधिक पाण्यातून वाट काढावी लागली. पालघर- माहीम मार्गावर वाघुळसार परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक देखील बंद होती.

मुसळधार पावसामुळे पालघर नगरपरिषद हद्दीत बहुतांश ठिकाणी रस्त्यांवर, घर-वस्त्यांमध्ये, सखल भागात पाणी साचल्याने पालघर शहर परिसर देखील जलमय झाल्याचे दिसून आले. नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे.

Palghar rainfall
Vasai Virar Heavy Rain | रात्रभराच्या मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; महापालिकेच्या '१०० टक्के नालेसफाई'च्या दाव्याची पुन्हा पोलखोल

पालघर नगरपरिषद हद्दीत, शहर परिसरात अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांचे मार्ग बदलण्यात आले असून अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने, त्याचप्रमाणे नाले व गटार सफाई योग्यरित्या न झाल्याने अशा पूर्व परिस्थितीचा सामना करावा लागल्याचा आरोप पालघरकर नागरिकांनी केला असून याबाबत संताप व्यक्त केला आहे.

पालघर जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा रेड अलर्ट

पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अक्षरशः थैमान घातले आहे. दरम्यान मंगळवारी देखील पालघर जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नदी, नाले, ओढे, धबधबे व समुद्रकिनारी जाणे टाळा. पाण्याचा वेग आणि पातळी अचानक वाढू शकते.

पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवू नका. पर्यायी व सुरक्षित मार्गाचा वापर करा. झाडे, जीर्ण इमारती, भिंती व वीज खांबांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पालघर- बोईसर मुख्य मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नाला मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आणि रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पावसाच्या पुराचे पाणी साचले. त्यामुळे पालघर- बोईसर या मुख्यमार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. पालघर- सातपाटी मार्गावर टेंभोडे नाक्याजवळील ओहोळावरून रस्त्यावर पाणी वाहत असल्याचे दिसून आले. टेंभोडे- चाफेकर महाविद्यालय मार्गावर पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news