Vasai Virar Heavy Rain | रात्रभराच्या मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; महापालिकेच्या '१०० टक्के नालेसफाई'च्या दाव्याची पुन्हा पोलखोल

अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यात आणि वाहनतळांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान
Vasai Virar Waterlogging News
शहरातील प्रमुख रस्ते, सखल भाग, बाजारपेठा आणि अनेक रहिवासी संकुले पाण्याखाली गेली. Pudhari
Published on
Updated on

Vasai Virar Waterlogging News

विरार : वसई-विरार शहराला शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते, सखल भाग, बाजारपेठा आणि अनेक रहिवासी संकुले पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी गुडघाभर ते कंबरेएवढे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. काही भागात वीजपुरवठा खंडित झाला, तर अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यात आणि वाहनतळांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला, तर अनेक दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहने बंद पडल्याची परिस्थिती निर्माण झाली.

विरार पूर्वेकडील मनवेलपाडा, कारगिल नगर, स्टेशन परिसर, नाना-नानी पार्क, फुलपाडा, जीवदानी रोड या भागांमध्ये पावसाच्या पाण्याने अक्षरशः तळ्याचे स्वरूप धारण केले. स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांना रात्रभर जागून परिस्थितीचा सामना करावा लागला.

Vasai Virar Waterlogging News
Vasai Flood Rescue | वसईत पुरात अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

विरार पश्चिमेकडील विवा महाविद्यालय परिसर, डोंगरपाडा, आगाशी, बोळींज या भागांनाही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. मुख्य रस्ते आणि अंतर्गत मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. अनेक रिक्षा आणि दुचाकी पाण्यात बंद पडल्या, तर काही ठिकाणी उघडी गटारे आणि मॅनहोल पाण्याखाली गेल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

नालासोपारा शहरातही परिस्थिती गंभीर होती. सेंट्रल पार्क, आचोळे रोड, स्टेशन परिसर आणि आसपासच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. बाजारपेठा, दुकाने आणि काही व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला.

Vasai Virar Waterlogging News
Vasai Virar Water Pipeline Burst : ट्रकच्या धडकेत जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

दरम्यान, वसई, नायगाव, नालासोपारा आणि विरार परिसरातील अनेक सखल भागांमध्ये जलनिस्सारण व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या, तर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेची पथके, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क ठेवण्यात आला.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी "१०० टक्के नालेसफाई पूर्ण" झाल्याचा दावा करणाऱ्या वसई-विरार शहर महापालिकेच्या कामकाजावर यंदाही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्याच जोरदार पावसानंतर शहरातील प्रमुख रस्ते आणि सखल भाग जलमय झाल्याने नालेसफाईच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पावसाचे पाणी तासन्तास रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक कचरा, अतिक्रमणे आणि अपुरी जलनिस्सारण व्यवस्था यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. शहरात वाढणारे काँक्रीटीकरण, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे आणि नियोजनाचा अभाव यामुळे पावसाचे पाणी थेट रस्ते आणि रहिवासी भागात साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Vasai Virar Waterlogging News
Vasai Virar Anganwadi : वसई-विरारमध्ये अंगणवाड्यांत आवश्यक सुविधांचा प्रश्न गंभीर

तज्ज्ञांच्या मते, केवळ नालेसफाई करून ही समस्या सुटणार नाही. शहरासाठी आधुनिक पर्जन्यजल निचरा व्यवस्था, मोठ्या क्षमतेच्या जलवाहिन्या, नैसर्गिक नाल्यांचे संवर्धन, सखल भागांत कायमस्वरूपी पंपिंग केंद्रे आणि दीर्घकालीन जलनियोजन आवश्यक आहे. अन्यथा दरवर्षी पहिल्या मुसळधार पावसानंतर वसई-विरारकरांना अशाच जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.

"महापालिका दरवर्षी नालेसफाईचे दावे करते; पण पहिल्याच मुसळधार पावसात शहर जलमय होते. आता आश्वासन नको, कायमस्वरूपी उपाय हवा."

— संतोष पाटील, विरार

"घरात पाणी शिरल्याने फर्निचर, विद्युत उपकरणे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले. ही समस्या दरवर्षीची झाली आहे."

— स्मिता शिंदे, नालासोपारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news