

पालघर: जव्हार येथील पर्यटनस्थळांचा विकास होऊन येथील पर्यटन अधिक समृद्ध व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी या भागात उपलब्ध केला जात आहे. अशातच जिल्ह्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर दोन कोटी रुपये खर्चून स्कायवॉक बांधण्यात आला आहे.
या स्काय वॉक वरून धबधब्याचे विहंगम दृश्या बरोबरच आजूबाजूची दरी जंगल देखील अधिक आकर्षक दिसते.यासाठी जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखड यांनी स्वतः लक्ष घालून सगळी प्रक्रिया पार पाडली. याशिवाय याची पाहणी देखील महिनाभरापूर्वीच केली होती.
खरंतर हा स्कायवॉक जव्हारच नव्हे तर राज्यभरासाठी देखील आकर्षण ठरणारा आहे. मात्र हा स्कायवॉक प्रत्यक्ष खुला करण्यासाठी अधिक उशीर झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. कारण आजवर अनेक लोकांनी यावर जाऊन आपले फोटो समाजमाध्यमांवर टाकल्याने हा स्कायवॉक सुरू झाला म्हणून अनेक पर्यटक याठिकाणी आले. मात्र काही खास लोकांना यावर जाण्यापासून रोखता न आल्याने हा प्रकार घडल्याचे आता समोर आले. मात्र काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी जाखड यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत अधिकृत उद्घाटन होईपर्यंत हा स्कायवॉक पूर्णपणे बंद ठेवावा अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या. यामुळे आता हा स्कायवॉक १५ ऑगस्ट रोजी खुला होणार आहे.
मुळात आता या आदेशा नंतर अनेक बाबी निदर्शनास येत आहेत. मुळात हा स्कायवॉक कही लोकांसाठी कसा खुला होता याची माहिती जिल्हाधिकारी यांना नव्हती हेच आता समोर येत आहे. मात्र कही स्थानिक पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अशा लोकांनी स्कायवॉक पाहून आपले फोटो व्हायरल केलेही कारण संबंधित विभागाला त्यांचा आग्रह नाकारता आला नसेल ही बाब समजण्यासारखी आहे.
मात्र या स्कायवॉक चा एक जुना व्हिडिओ समोर येत असून चक्क याठिकाणी पर्यटक रांगेत उभे राहून स्कायवॉक वर चढत असल्याचे दिसून येत आहे. याहूनही गंभीर म्हणजे तिकीट देखील यावेळी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हा प्रकार किती दिवस सुरू होता याची निश्चित माहिती समोर आली नसली तरी दोन ते तीन दिवस या रांगा सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे जर या स्कायवॉक चे अधिकृत उद्घाटन होणे बाकी आहे याशिवाय यातील काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणे बाकी असताना पर्यटकांकडून रांग लावून पैसे कोणी घेतले ? हा मोठा प्रश्न समोर आला आहे.
यामुळे अनेक पर्यटक नाराज असून मध्येच चालू मध्येच बंद असा प्रकार घडत आहे तर काहीचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहे यामुळे हा प्रकार नेमका काय हाच खरा प्रश्न आहे मात्र या सगळ्यात मध्येच कोणीतरी तिकीट आकारून वसुली केल्याने याचीही चर्चा आता रंगली आहे.
यावेळी तब्बल ५० ते १०० रुपये घेतल्याचे देखिल आता समोर आले आहे यामुळे स्कायवॉक खुला करून तिकिटे काढण्याची परवानगी कोणत्या विभागाने दिली होती जर यात शासकीय कार्यालयाचा समावेश नसेल तर मग याचा कोणी खासगी मालक आहे का ज्याला शासनाने स्कायवॉक चालवायला दिला आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून हा स्कायवॉक त्याच्या बनविण्याच्या प्रक्रियेपेक्षा चालू की बंद,उद्घाटन, व्हीआयपी साठी खुला या प्रकरणावरूनच जास्त चर्चेत आला आहे. त्यामुळे अनधिकृत रीत्या पैसे कोणी घेतले याचा तपास होणे आता आवश्यक झाले आहे.