

पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर तालुक्यातील दुर्वेस गावातील चाचू पाडा परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र, समाज माध्यमातून व्हायरल होत असलेला फोटो एआय च्या वापर करून तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. पट्टेरी वाघाची अफवा असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले असून अफवा पसरवणाऱ्यां विरोधात कारवाईचा इशारा आहे.
समाज माध्यमांवर फिरत असलेल्या संदेशांमध्ये दुर्वेस गावाच्या चाचू पाडा हद्दीतील वळण परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.याबाबत ग्रामस्थांकडूनही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शेतीच्या कामासाठी किंवा जंगल परिसरात जाताना सावधगिरी बाळगावी, रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर फिरू नये, घरांचे दरवाजे व खिडक्या बंद ठेवाव्यात, अशा सूचना समाज माध्यमांद्वारे दिल्या जात आहेत.
दरम्यान, दहिसर वनपरीक्षेत्रात पट्टेरी वाघ दिसल्याची कोणतीही अधिकृत माहिती वनविभागाला मिळालेली नाही. समाज माध्यमांवरील माहिती ही अफवा असल्याचे सांगितले. पालघर जिल्ह्यातील जंगलांमध्ये पट्टेरी वाघाचे वास्तव्य नसून परिसरात प्रामुख्याने बिबट्यांचा वावर असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या माहितीनंतर वनविभागाकडून दुर्वेस येथील संबंधित ठिकाणाची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणताही वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महामार्गालगत असलेल्या दुर्वेस परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हालचालींची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांच्या वावराबाबत सतर्कता वाढली आहे.
दुर्वेस गावामध्ये समाज माध्यमाद्वारे व्हायरल झालेला वाघाचा फोटो गावातील विद्यार्थ्याने एआय च्या मदतीने तयार करून व्हायरल केला आहे.तरी सदरचा प्राणी हा पट्टेदारी वाघ नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.वन्य प्राणी आढळून आल्यास वनविभागास तात्काळ संपर्क साधावा.अफवा पसरवू नये अन्यथा वनविभागामार्फत कारवाईचा करण्यात येईल.
- हृषीकेश वाघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी,दहिसर (प्रा)