Rudrankksh Patil: आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या रुद्रांक्ष पाटीलचे ठाण्यात जंगी स्वागत

देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने पदकांची कमाई करणाऱ्या युवा नेमबाजाच्या यशाचा ठाणेकरांनी केला गौरव
Rudrankksh Patil
Rudrankksh Patil Pudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी करणाऱ्या ठाणेकर आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्ष पाटील यांचे ठाण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. रुद्रांक्षच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमी, विद्यार्थी तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्व द्रुतगती महामार्गावर त्याचे आगमन होताच उपस्थितांनी घोषणाबाजी करत त्याचे अभिनंदन केले. देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने पदकांची कमाई करणाऱ्या या युवा नेमबाजाच्या यशाचा ठाणेकरांनी मोठ्या उत्साहात गौरव केला.

Rudrankksh Patil
Sidhu Abhange: ठाण्यातला कुख्यात गुंड सिद्धू अभंगेला महिलांनी पोलीस ठाण्यात दिला चोप

आशियाई क्रीडा स्पर्धेत रुद्रांक्षने उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या पदकतालिकेत भर घातली. सांघिक प्रकारात त्याने दोन रौप्यपदके मिळवून दिली, तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

दबावाच्या परिस्थितीतही शांतपणे कामगिरी करण्याची त्याची क्षमता पुन्हा एकदा या स्पर्धेत दिसून आली. यापूर्वीही जागतिक आणि आशियाई स्तरावर आपल्या नेमबाजीचा ठसा उमटविणाऱ्या रुद्रांक्षकडून देशाला भविष्यात आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Rudrankksh Patil
Prashant Thakur: निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेने राहुल गांधींचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उद्ध्वस्त; प्रशांत ठाकूर यांचा घणाघात

रुद्रांक्ष पाटील यांचा नेमबाजीतील प्रवास मात्र नियोजनबद्ध नव्हता. फुटबॉल आणि स्केटिंगची आवड असलेल्या रुद्रांक्षला २०१४ मध्ये मेजर गावंड यांच्या द्रोणाचार्य शूटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.

प्रशिक्षक स्नेहल कदम यांनी त्याला नेमबाजीचे प्रशिक्षण देण्याची सूचना वडील बाळासाहेब पाटील यांना केली. सुरुवातीला वडिलांच्या आग्रहामुळे प्रशिक्षणाला जाणाऱ्या रुद्रांक्षला जिल्हा आणि शालेय स्पर्धांमध्ये पदके मिळू लागली.

शाळेत होणाऱ्या सत्कारामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि हळूहळू नेमबाजीची आवडच त्याचे ध्येय बनली. पुढे कठोर सरावाच्या जोरावर त्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण केले.

२०२२ मध्ये कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकत रुद्रांक्षने इतिहास रचला. या कामगिरीमुळे अभिनव बिंद्रानंतर या प्रकारात वैयक्तिक विश्वविजेतेपद मिळविणारा तो दुसरा भारतीय ठरला. त्याच्या यशामुळे भारताला पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटाही मिळाला.

आई-वडिलांनी सातत्याने दिले पाठबळ

रुद्रांक्ष पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील हे ठाणे शहर परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त असून, आई हेमांगिनी पाटील या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी आहेत. रुद्रांक्षच्या नेमबाजीच्या कारकिर्दीत आई-वडिलांनी सातत्याने पाठबळ दिले असून, त्याच्या सरावासाठी आणि स्पर्धांच्या तयारीसाठी दोघांनीही मोठे कष्ट घेतले आहेत.

रुद्रांक्षच्या या प्रवासात आई , वडील, प्रशिक्षक अजित पाटील, स्नेहल कदम आणि दिवंगत डॉ. आनंद नाडकर्णी यांचे मोठे योगदान आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सराव, त्यानंतर पवई येथे फिजिओथेरपी असा त्याचा कठोर दिनक्रम होता. ‘मुलाच्या स्वप्नासाठी त्याने घेतलेले कष्ट पाहिले आहेत. देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवावे, हेच त्याचे आणि आमचे स्वप्न आहे,’ अशी भावना त्याची आई हेमांगिनी पाटील यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news