

पालघर ः पालघर जिल्ह्यातील नायगाव येथे एका सलूनमध्ये स्पीकरवर मोठ्या आवाजात ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ हे देशविरोधी गाणे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह याला बेड्या ठोकल्या आहेत. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
1 जानेवारी 2026 रोजी पोलिस उपनिरीक्षक पंकज किलजे त्यांच्या खासगी वाहनातून गस्त घालत असताना त्यांना रूहान हेअर कटिंग सलूनमधून ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ हे वादग्रस्त गाणे मोठ्या आवाजात ऐकू आले. हे गाणे देशाचे सार्वभौमत्व आणि एकतेच्या विरोधात आहे. त्यातून समाजात शत्रुत्व, द्वेष पसरू शकतो आणि सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. यामुळे पोलिसांनी त्वरित सलूनमध्ये छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता हेच गाणे यूट्यूबवर लावले असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 197 (1) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात दोषी व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.