

The minor boy who brutally murdered his professor father has been sentenced to life imprisonment.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका प्रतिष्ठित महाविद्यालयात इंग्रजी विभागाचा प्राध्यापक असलेल्या पित्याचा खून निर्घण के ल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. मोमिन यांनी बुधवारी (दि.१०) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
खुनाच्या घटनेत, गुन्ह्याच्या क्रूरतेमुळे आणि पूर्वनियोजित कटामुळे अल्पवयीन असलेल्या मुलाला प्रौढ समजण्यात येऊन न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राध्यापकाच्या राहत्या घरी त्यांची निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या डोक्यावर डंबलने वार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा गळा आणि हाताच्या नसा कापण्यात आल्या होत्या. निर्दयीपणे केलेल्या या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घरातीलच कुणी तरी खून केला असावा, असा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करत घटनेच्या तब्बल सात दिवसांनंतर अल्पवयीन मुलाला पकडले होते.
तपास करणारे पोलिस अधिकारी तत्कालीन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिर्छु, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे, ब्रम्हा गिरी, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे, श्रध्दा वायदंडे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, अनिता फासाटे, गुळवे, अमोल म्हस्के, पवन इंगळे व कर्मचा यांनी दिवसरात्र अथक प्रयत्न करुन पुरावे गोळा केले. त्यानंतर न्यायालयात प्रभावीपणे दोषारोपपत्र सादर केले. हे पथक सात दिवस घटनास्थळी तळ ठोकून होते.
प्रौढ समजून चालवला खटला पोलिसांच्या दोषारोपपत्रातील या धक्कादायक बाबींमुळे, १७ वर्षे ८ महिन्यांच्या या अल्पवयीन मुलाला जेजे अॅक्टच्या तरतुदीनुसार प्रौढ समजण्यात आले आणि त्याचा खटला सत्र न्यायालयासमोर चालविण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील ए.एस. देशपांडे यांनी ३२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यातील प्रमुख चार साक्षीदार फितुर झाले. सुनावणीअंती क्रूर कृत्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि अल्पवयीम मुलाला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २५८(२) नुसार भादंवि कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून त्याला जन्मठेप आणि १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.