

Umroli Police Raid
पालघर : पालघर तालुक्यातील गरजू लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन लुबाडणुक करणाऱ्या अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या विरोधात पालघरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बोईसर शहरातील भीमनगर आणि उमरोळी भागात अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या आहेत. भीम नगर येथिल सावकार सागर करनकाळे, कपिल करनकाळे आणि उमरोळी गावातील अमोल नारखेडे याच्या विरोधात अवैध सावकारी व्यवसाय केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
बोईसर शहरातील भीम नगर येथील सागर करनकाळे, कपिल करनकाळे आणि उमरोळी गावातील अमोल नारखेडे अवैध सावकारी व्यवसाय करून गरजू लोकांच्या अडचणीचा फायदा, लुबाडणुक आणि पिळवणूक केली जात असल्याची तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयास करण्यात आली होती. तक्रारी नुसार निबंधक कार्यालयाकडून तिघांची गोपनीय माहिती काढण्यात आली. यात सागर करनकाळे, कपिल करनकाळे आणि अमोल नारखेडे बेकायदेशिररित्या सावकारी करीत असल्याचे आढळून आले.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सावकारांचे सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांनी कारवाईसाठी सहकारी अधिकारी विठ्ठल आबुलवार यांची नेमणूक केली होती. विठ्ठल आबूल बार यांनी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात अमोल नारखेडे याचे उमरोळी गावातील घर तसेच सागर/कपिल करनकाळे याच्या भीमनगर येथील घरावर धाड टाकून घराची झडती घेतली. झडतीत दोन्ही ठिकाणी अवैध खाजगी सावकारी दस्तऐवज, अभिलेख, तसेच इतर कागदपत्रे आढळून आली. कारवाई दरम्यान आढळून आलेली कागदपत्रे पंचनामा करून जमा करण्यात आली.
झडतीत आढळलेली कागदपत्रे आणि तक्रारीनुसार अमोल नारखेडे, सागर करनकाळे आणि कपिल करनकाळे गाने कर्जदारा विरोधात शारीरीक इजा, दहशत, धमकी, मानसिक दबाब आणि छळ करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.
सहकार अधिकारी निबंधक विठ्ठत आबुलवार यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अवैध खाजगी सावकारी व्यवसाय करणाऱ्या अमोल नारखेडे, सागर करनकाले आणि कपिल करनकाळे वाच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३६,४१ (सी), ४५/४८ नुसार पालघर आणि बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.