

डहाणू: डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील प्रसिद्ध भीम बांधावर गुरुवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या एका महिला पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मीना पराड (वय ३९), रा. आवढाणी, डहाणू या महिला दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडाल्या असून त्या अद्यापही बेपत्ता आहेत.
मीना पराड आपल्या कुटुंबासह सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी वाघाडी येथील भीम धरण परिसरात आल्या होत्या. दुपारी त्यांनी धरणाच्या वरच्या बाजूने थेट पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे त्या खोल पाण्यात ओढल्या गेल्या आणि काही क्षणांतच बेपत्ता झाल्या.
यावेळी उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी आणि पर्यटकांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक दिली. काही वेळातच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गोताखोरांना पाचारण करण्यात आले.
मागील १८ तासांपासून महिला पर्यटकाचा शोध सुरू असून, पोलीस प्रशासन, स्थानिक बचाव पथक व ग्रामस्थांचे संयुक्त पथक शोधकार्य करत आहे.
दरम्यान, या भागात सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था, चेतावणी फलक व मार्गदर्शक सूचना नसल्याचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पर्यटन स्थळांवर सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे.