

Palghar Police First Ranking in Maharashtra
पालघर : लोकाभिमुख प्रशासन, जनसंवाद, गुन्ह्यांची उकल व नागरिकांना सहज उपलब्ध होणारे पोलीस अशा विविध गुणांच्या आधारे पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे. राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाला 100 गुणांपैकी 91 गुणांच्या जवळपास गुणांकन मिळाल्यामुळे पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रातील 34 जिल्हा पोलीस दलामधून अव्वल स्थानी आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नवनवीन संकल्पना व लोकाभिमुख प्रशासन कार्यप्रणालीमुळे पोलीस दलाला हे मानांकन मिळणे शक्य झाले आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची संकल्पना असलेल्या शंभर दिवसीय सात कलमी कार्यक्रमांमध्ये पालघर पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील 16 पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारणात सुसूत्रता, कार्यालयीन सुविधा, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी अशा विषयांना गुणांकन देण्यात येणार होते. या सर्व कलमांमध्ये जिल्हा पोलीस दलाचा अव्वल नंबर आला आहे. त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचे मानांकन गृह विभागातर्फे देण्यात आले आहे.
भारतीय गुणवत्ता परिषदेकडून सात कलमी कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसांच्या सुसूत्र कामांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात आले होते. राज्यभरातील पोलीस विभागांमध्ये हे मूल्यमापन केले गेले. पालघर पोलीस दलाला 100 पैकी 90.29 गुण प्राप्त झाले या अगोदरही 50 दिवसांच्या कार्यालयीन गुणांकनामध्ये जिल्हा पोलीस प्रथम क्रमांकावर होते.
पालघर जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हा पोलिसांचे संकेतस्थळ अद्यायवत करून ती सोपी व सर्वांना समजणारी बनवण्यात आली होती. चॅट बॉक्स सुविधा स्थापन करून नागरिकांना पोलिसांशी सहज संवाद साधता येत होता . सुकर जीवनमान अंतर्गत पोलिसांनी सायबर सुरक्षित पालघर जिल्हा मोहीम राबवून सायबर विषयक जनजागृतीची जिल्हाभर अभियान राबवली. ए आय या तंत्रज्ञानावर आधारित चॅट बॉक्स प्रणाली याच बरोबरीने पोलीस दलांकडून स्वच्छता मोहीम, तक्रारदारांची तक्रार लक्षात घेऊन त्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण, ई ऑफिस प्रणाली, अभ्यंगत व्यवस्थापन प्रणाली, कार्यालयीन कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, गस्तीसाठी थर्ड एप्लीकेशन तसेच सीसीटीव्ही निगराणी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून पालघर जिल्हा पोलीस दलाने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. याच आधारे त्यांना चांगले गुणांकन मिळून पालघर जिल्हा हा अव्वल स्थानी आला आहे.
जिल्ह्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस, कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे पालघर जिल्हा अव्वल स्थानी येऊ शकला व या सर्वांचे श्रेय जिल्ह्यातील सर्व पोलिसांना जाते, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.