

ठाणे ः अनुपमा गुंडे
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ कलाकारांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना राबविण्यात येते. या योजनेचे मानधन मिळविण्यासाठी कलाकारांना नोव्हेंबर अखेर हयातीच्या दाखला सादर करण्यासाठी करावी लागणारी पायपीट आता थांबणार आहे. कलाकारांना हयातीचे जीवनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुलभ व सहजपणे करता यावी आणि त्यांचे मानधन अखंडपणे सुरू रहावे यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ॲप विकसित केले आहे. हे ॲप कार्यान्वित झाले असून आतापर्यंत 2 हजार कलाकार व साहित्यिकांनी याचा लाभ घेतला आहे.
राज्यातील ज्येष्ठ कलावंत व साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने उदरनिर्वाहासाठी दरमहा सरसकट 5 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. राज्यात सुमारे 38 हजार 500 कलाकार या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र सेवानिवृत्ती वेतनधारकाप्रमाणे या लाभार्थींनाही दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर अखेर हयात असल्याचे जीवनप्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील कलाकारांना महा ई सेवा केंद्राकडे धाव घ्यावी लागत असे. अनेकदा या कलाकारांच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्यांची दिशाभूल किंवा फसवणूकीही केली जात असे.
काही कलाकार हयातीचा दाखला सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे कुरियर किंवा पोस्टामार्फत पाठवत असत., त्यानंतर संचालनालयाच्या वतीने आधार कार्डाच्या आधारे पडताळणी केली जात असे, यात विशेषतः ल कलाकारांचा वेळ व पैसा खर्ची होत असे. अनेकदा एखाद्या कलाकाराचे निधन झाल्यावरही खोटे प्रमाणपत्रही सादर केली जाण्याचे प्रकार तुरळक का होईना घडत असत.
ही योजनेची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होते. त्यात यंत्रणेतील कर्मचार्यांनाही लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी भरपूर वेळ द्यावा लागत असे. मात्र या ॲपमुळे यंत्रणा आणि लाभार्थी दोन्हींच्या वेळेची बचत होण्याबरोबरच या योजनेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.
लाभार्थी आणि यंत्रणा दोन्हींसाठी जीवनप्रमाणपत्र पडताळणीची ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी हे ॲप विकसित झाल्याने कामकाजात सुरळीतता होण्याबरोबरच जलदगतीने पडताळणी होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे कलाकारांना वेळेत मानधन मिळण्यास मदत होणार आहे
विभीषण चवरे, संचालक - सांस्कृतिक कार्य संचालनालय.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत , योजनेचे मानधन अखंड सुरू राहावे यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विविध कलाप्रकारातील कलाकारांना दिव्यातून जावे लागत असे. अनेक ज्येष्ठ कलाकारंना वयोमानानुसार तेही शक्य होत नसे, या डिजीटल सुविधेमुळे कलाकारांना हे प्रमाणपत्र सादर करणे सोपे झाले आहे.
सुभाष जाधव, ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन मुंबई