नीती मेहेंदळे
अकोला जिल्ह्यात अनेक लहान-मोठी प्राचीन गावं आहेत. तसा हा भूभाग काही पर्वतराजींचा नाही. उगाच आपलं खडकाळ टेकड्या दिसतात. अधूनमधून तेच काय ते पर्वतसान्निध्य त्यांचं. पिंजरडा नदीच्या काठी वसलेलं पिंजर हे एक असंच बुटक्या खडकाळ टेकड्यांमध्ये दडलेलं, एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. अकोला शहराच्या आग्नेयेस 40 किमी अंतरावर बार्शीटाकळी तालुक्यात पिंजर गाव स्थित आहे. कमी उंचीच्या खडकाळ टेकड्यांमध्ये वसलेल्या या गावाभोवती पूर्वी भक्कम तटबंदी होती. येथे गावात एक विटांचा किल्लाही होता. या तटबंदीचे तसेच किल्ल्याचेअवशेष आजही पाहायला मिळतात.
गावात फेरफटका मारताना त्याच्या प्राचीन खुणा आढळून येतात. पिंजरडा नदी आणि गावातल्या जुन्या बारवा हे गावाच्या पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत आहेत. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या ‘अकोला डिस्ट्रिक्ट व्हॉल्यूम 1’ (1910) मधील नोंदीनुसार, 18व्या शतकात पिंजर हे परगण्याचे मुख्यालय होते. त्या वेळी येथे सुमारे दोन हजार घरे होती अशी नोंद सापडते. नागपूरचे सरसेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले (द्वितीय) यांचे वडील मुधोजी राजे यांनी इ.स. 1772 मध्ये पिंजरवर मोठा करभार लादला. त्यामुळे पिंजरची आर्थिक स्थिती ढासळत गेली.
परिणामी येथील लोकसंख्या कमी होत गेली. गॅझेटियरमधील उल्लेखानुसार इ.स. 1867 मध्ये येथे 700 तर इ.स. 1901 मध्ये 612 घरे उरली होती. यावरून या आधीच्या काळात कपिलेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असावा, असा जाणकारांचा अंदाज आहे. येथील कपिलेश्वर महादेवाचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिर, तसेच त्या नजीक असलेली प्राचीन चौबारी पायविहीर पिंजरच्या तत्कालीन सुबत्तेची ग्वाही देत आजही उभी आहे.
कपिलेश्वर मंदिर यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. मात्र गॅझेटियरमधील नोंदीनुसार, त्याचा 18व्या शतकाच्या मध्यावर मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला असं समजतं. गावात विठ्ठल रुक्मिणी, राम मंदिर आदी जुनी मंदिरं आहेत. पण, गावाची ओळख म्हणजे कपिलेश्वर महादेवाचं मंदिर. पिंजर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कपिलेश्वर महादेवाच्या मंदिराभोवती आवारभिंत आहे. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात प्रवेशद्वाराच्या उजवीकडे चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे.
मंदिर आजही उत्तम स्थितीत असून त्याला स्वतंत्र नंदी मंडप आहे. मंदिर त्रिदल पद्धतीचं बांधलेलं असून मुख्य गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. मंदिरासमोर उजवीकडे प्राचीन दगडी दीपमाळ आहे. नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या हेमाडपंती मंदिराची संरचना आहे. उंच चौथऱ्यावर असलेल्या नंदीमंडपात चार स्तंभांच्या मध्ये अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. नंदीसमोर शिवपिंडी आहे. नंदीमंडपाच्या ओट्याच्या पायथ्याशी एक प्राचीन शिलालेख व ओट्याला लागून एक मोठा त्रिशुळ आहे. मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला करोटक पद्धतीचं भव्य छत आहे. या मुखमंडपात दोन्ही बाजूने कक्षासने आहेत. सभामंडपातील देवकोष्टकांमध्ये गणपती, श्रीदत्त, राधा-कृष्ण आदी देव-देवतांच्या मूर्ती आहेत.
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या खालच्या भागात कीर्तिमुख कोरलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन्ही बाजूंना गजराजांची शिल्पे आहेत. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. वरच्या भागात असलेल्या पंचधातूच्या गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. गर्भगृहातील एका देवळीत शिवमुखवटा आहे व त्यावर नागाने छत्र धरले आहे. मंदिराच्या बाह्य किंवा आतल्या भिंतींवर फारसं मूर्तिकाम नाही. नाही म्हणायला काही भग्नावस्थेतल्या प्राचीन मूर्ती मंदिर परिसरात मांडून ठेवलेल्या आढळतात.
या मंदिराच्या प्रांगणात असलेल्या नंदीमंडपाच्या ओट्यावर 17-18 ओळींचा संस्कृत भाषेतील एक प्राचीन शिलालेख आहे. मंदिराच्या इतिहासावर या साधनातून प्रकाश पडू शकला असता, परंतु त्यावरील अक्षरे पुसट झाल्याने तो अवाचनीय झाला आहे. त्यावर असलेली ‘कीर्ती’ व ‘प्रशस्ती’ ही दोनच अक्षरे संशोधकांना ओळखता आली आहेत. त्याची अवस्था तितकीशी चांगली नसून त्यातल्या काही तपशीलांवरून मंदिराचा जीर्णोद्धार झाला असल्याचे संकेत मिळतात.
या लेखाचं वाचन झालं तर पिंजर गावाचा काळ शोधायला नक्कीच मदत होईल. मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. आठ दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी येथे कावड यात्रा येते. या यात्रेच्या आदल्या दिवशी भाविक कलशांमधून काटेपूर्णा नदीतील पवित्र जल कावडींमध्ये भरतात.
ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या या कावड यात्रेत अनेक देखावेही असतात. गावातील गुलालशेख महाराज संस्थान, शिवशंभो मंडळासह अनेक मंडळांतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या यात्रेत शेकडो नागरिक तसेच अघोरी साधूही सहभागी होतात. ही यात्रा मंदिरात आल्यावर कावडींमधील जलाने शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.
या मंदिरापासून काही अंतरावरच ‘चौबारी विहीर’ या नावाने प्रसिद्ध असलेली पायविहीर आहे. हेमांडपंती स्थापत्य शैलीत बांधलेली भव्य पायविहीर चौरसाच्या आकारात आहे. तिच्या चारही बाजूंनी अनेक पायऱ्या आहेत. त्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. येथील काही देवकोष्ठांमध्ये देव-देवतांच्या मूर्ती आहेत तर काही कोनाडे रिकामेच आहेत. या विहिरीत बाराही महिने पाणी असते, पण स्वच्छतेचा अभाव असल्याने आज त्यावर शेवाळं जमलं आहे. ही बारव संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे.
गावात एक विठ्ठल मंदिर असून त्याचा जीर्णोद्धार विसाव्या शतकाच्या सुरुवातीला करण्यात आला होता. मंदिराच्या स्थापत्याचे ते एक स्वप्न होते की जर गावात मोठे विठ्ठल मंदिर बांधले गेले तर पंढरपूरप्रमाणेच तेथे पूजा होईल आणि नंतरच्या ठिकाणी लांब तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
याशिवाय पिंजर गावात एक पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. त्याची रचना निश्चित जुनी आहे. मुख्य म्हणजे मंदिरात एक भुयारी मार्ग असून तो विटांचा बांधलेला आहे. साधूंच्या ध्यानधारणेसाठी कदाचित हा मार्ग बांधला असावा. मंदिराच्या वरच्या बाजूस उंच पायऱ्या असून त्या आपल्याला गच्चीत नेतात. इथून पूर्ण पिंजर गावाचं दर्शन होतं. अशी अनेक आश्चर्ये पोटात दडवलेलं पिंजर हे लहानसं पण वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे.