

विरार: लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आणि अश्लील चित्रफितींच्या आधारे तिला धमकावल्याचा आणि ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार नालासोपारात समोर आला आहे. याप्रकरणी आरिफ आयुब शेख (२२) याला पोलिसांनी अटक केली असून त्याची आई रुक्साना खान आणि साहिल खान यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरिफने तब्बल ७० ते ८० तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मात्र, या दाव्यांची सत्यता पोलिस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
पीडित तरुणीची आरिफ शेख याच्याशी मैत्रिणीमार्फत समाजमाध्यमांवरील अनुयायांच्या एका समारंभात ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवून लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. पुढे तिची आरोपीच्या आईशीही भेट घडवून आणण्यात आली. त्यावेळी तरुणीच्या घरात भूतबाधा असल्याचे सांगून तिच्या मनात भीती निर्माण करण्यात आली आणि तिला आरोपीच्या घरी राहण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तेथे राहू लागल्यानंतर लग्नाचे आश्वासन देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी बाब म्हणजे कथित अश्लील चित्रफितींचा वापर करून तरुणीला धमकावल्याचा आरोप. आरोपीच्या मोबाईलमध्ये अन्य तरुणींच्या आक्षेपार्ह चित्रफिती असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या चित्रफिती नेमक्या कोणाच्या आहेत, त्यांचा वापर धमकावण्यासाठी झाला का, त्यांचा प्रसार करण्यात आला का आणि यामागे अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून मिळणार आहेत. ७० ते ८० तरुणींना अशाच प्रकारे लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोमय्यांकडून मोठ्या रॅकेटचा आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी सायंकाळी नालासोपारा पोलिस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कथित चित्रफितींच्या माध्यमातून तरुणींना धमकावण्यात आल्याचा, काही मुलींना परदेशात पाठविण्यात आल्याचा तसेच या प्रकरणामागे अमली पदार्थांची तस्करी, मोठे आर्थिक व्यवहार आणि राजकीय व कौटुंबिक पाठबळ असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने त्याबाबतचा निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.