

मुंबई: मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारच्या जागा परवाना शुल्कात सवलत आणि वार्षिक शुल्कवाढीचा दर निम्म्यावर आणण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
मुंबई पोलिस आयुक्तांनी १ जानेवारी २०१८ पासून ऑर्केस्ट्रा बारसाठी २ लाख रुपये जागा परवाना फी लागू करून प्रतिवर्ष १० टक्के नूतनीकरण वाढीची अधिसूचना जारी केली होती.
याविरोधात ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन’ (आहार) यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. याचिका प्रलंबित असल्याने परवानाधारक शुल्क जमा करत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने असोसिएशनच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अखेर या अधिसूचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्णयातील प्रमुख मुद्दे
शुल्कवाढीच्या अंमलबजावणीची तारीख बदलली
मुंबई पोलिस आयुक्त यांच्या ४ डिसेंबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार ऑर्केस्ट्रा बारच्या जागा परवाना शुल्कात केलेली वाढ ही १ जानेवारी २०१८ ऐवजी आता १ जानेवारी २०२० पासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे मागील दोन वर्षांच्या अतिरिक्त शुल्कात बारचालकांना थेट सवलत मिळाली आहे.
वार्षिक नूतनीकरण शुल्कवाढ ५ टक्क्यांवर
पूर्वी या परवाना शुल्कात दरवर्षी १० टक्के नूतनीकरण शुल्कवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, नवीन निर्णयानुसार ही वार्षिक वाढ १० टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आली आहे.
कोरोना कालावधीसाठी विशेष सवलत
कोरोनाच्या साथीमुळे बंद राहिलेल्या कालावधीची दखल घेत, २०२० आणि २०२१ या वर्षांमधील बार बंद असलेल्या कालावधीच्या प्रमाणात जागा व खेळ परवाना शुल्कात सवलत देण्यात आली आहे.