

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडे 09 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने खड्डापाडा, जाबरपाडा, पेल्हार, नालासोपारा पूर्व परिसरात सुरू असलेल्या निर्माणाधीन अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येत होती. या कारवाईला विरोध करत जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी 30 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी अश्विनी रामचंद्र मोरे, सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार, अति. कार्यभार प्रभाग समिती ‘फ’ पेल्हार, हरेश्वर पाटील, सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती ‘एच’ नवघर यांच्यासह कनिष्ठ अभियंते, लिपिक, महानगरपालिकेचे इतर कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 22 सुरक्षा रक्षक तसेच महानगरपालिकेचे जेसीबी वाहन व चालक उपस्थित होते. दरम्यान, जाबरपाडा रोड येथे अनधिकृत बांधकामांपर्यंत महापालिकेची वाहने पोहोचू नयेत यासाठी काही इसमांनी जाणीवपूर्वक खालील वाहने रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती चार वाहने,
यावेळी रकीब चौधरी, जावेद चौधरी, जावेद खान, धर्मेंद्र यादव, मोहम्मद मिट्टीवाला, पवन यादव, गौरव यादव, कल्लु यादव, संजय सिंग, राजू यादव, शिला नामकुडा, शकिल चौधरी, इम्तीयाज चौधरी तसेच त्यांच्यासोबत असलेल्या 25 ते 30 अनोळखी महिला व पुरुषांनी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली व अनधिकृत बांधकामांमध्ये बसून तोडक कारवाईस तीव्र विरोध केला.
सदर जमावाने आपसात संगनमत करून लोकसेवकांना त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून धाक दाखवून परावृत्त करण्याचा तसेच बलप्रयोग करून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी वरील वाहनांचे चालक व मालक तसेच नामनिर्देशित आरोपी आणि 25 ते 30 अनोळखी इसमांविरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.