Dual degree program : पालघरच्या विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचे दालन खुले

पालघरमध्ये मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्राचा पहिला प्रयोग
dual degree program
पालघरच्या विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचे दालन खुलेpudhari photo
Published on
Updated on

पालघर ः ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम पालघरमध्ये सुरू झाला असून, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपविभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. नियमित शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना दुहेरी पदवी घेण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरत आहे.

जागतिक स्तरावरील विद्यापीठांशी स्पर्धा करण्यासाठी ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाची गरज वाढत असताना, विद्यार्थ्यांमध्ये नव्या अभ्यासक्रमांबाबत मोठी जागरूकता निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. परदेशातील विद्यापीठांमध्ये शेकडो ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध असून, भारतीय विद्यार्थीदेखील नव्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे वेगाने वळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

dual degree program
School Education : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांवर टांगती तलवार

या उपक्रमासंदर्भातील सामंजस्य करारावर मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. शिवाजी सरगर आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड, संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे, उपाध्यक्ष सुधीर दांडेकर, धनेश वर्तक, मंगेश पंडित, अनिल पाटील, सुधीर कुलकर्णी तसेच उपप्राचार्य महेश देशमुख उपस्थित होते. या नव्या व्यवस्थेमुळे नियमित पदवी अभ्यासक्रम सुरू असतानाच विद्यार्थ्यांना दुसरी पदवी घेता येणार आहे.

तसेच शिक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांनाही एमबीए, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, अधिकारी आणि नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम विशेष लाभदायी ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. किरण सावे आणि संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांनी दुहेरी पदवीच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधील विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम पालघरमध्ये उपलब्ध व्हावेत, यासाठी विद्यापीठाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

dual degree program
Kolhapur : जिल्ह्यात 1554 शाळांत हरित क्रांती

प्रा. डॉ. शिवाजी सरगर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने डिजिटल शैक्षणिक सामग्री निर्मितीची आवश्यकता अधोरेखित केली. “दुहेरी पदवीची संधी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देईल. तसेच शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना छंद आणि उत्कटता जोपासण्याची संधीही मिळेल,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांना संधी

दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षणासाठी प्रवेश व परीक्षा शुल्क नाममात्र ठेवण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अधिक सुलभ आणि परवडणारे होणार आहे. कौशल्याधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन बाजारपेठेला आवश्यक तंत्रज्ञानसज्ज मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news