

पूनम देशमुख
कोल्हापूर ः शालेय पोषण आहारात सकस व ताज्या भाज्यांचा समावेश व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आत्मियता निर्माण व्हावी या हेतूने जिल्ह्यातील 1,554 शाळांमध्ये परसबाग बहरली आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शिक्षण विभागाकडून विशेष परसबाग स्पर्धा घेतली जात आहे. यामुळे शाळांमध्ये हरित क्रांतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी स्वतः परसबागेत काम करत नवनिर्मितीचा आनंद घेत आहेत.
शालेय स्तरावर या उपक्रमाचे प्रभावी मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण, कृषी, आरोग्य विभागातील अधिकारी, आहारतज्ज्ञ व स्थानिक प्रगतशील शेतकर्यांची समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती परसबागांची गुणवत्ता, उत्पादन क्षमतेसह विद्यार्थ्यांचा सहभाग याचा विचार करून तालुका व जिल्हा स्तरावर विजेत्या शाळांची निवड करणार आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळांना कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी सहायक , पर्यवेक्षक, स्थानिक शेतकरी, सेंद्रिय शेती करणारे पालक, स्वयंसेवी संस्था यांचे मार्गदर्शन घेता येणार आहे.
परसबागेची रचना /आराखडा : एकूण 10 गुण
हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड :20 गुण
परसबागेचे व्यवस्थापन :20 गुण
विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सहभाग : 20 गुण
उत्पादित भाजीपाल्यांचा आहारामधील समावेश : 10 गुण
परसबागेतील भाज्यांची विक्री : 5 गुण
सामाजिक संस्थाचे परसबाग उभारणीतील योगदान : 5 गुण
शाळेत ईसीओ-क्लबची स्थापना, त्याअंतर्गत राबवलेले उपक्रम : 5 गुण
अशा एकूण 100 गुणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.