Palghar Tanker Accident | चारोटी उड्डाणपुलाजवळ रसायनाचा टँकर पलटी; सुदैवाने गळती टळली

टँकरमधून कोणत्याही प्रकारची रासायनिक गळती न झाल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला
Mumbai Ahmedabad Highway  Chemical Tanker Overturns
रासायनिक द्रव्य वाहून नेणारा टँकर पलटी झाला Pudhari
Published on
Updated on

Mumbai Ahmedabad Highway Chemical Tanker Overturns

कासा : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यावर बुधवारी (दि. १५) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास डायमिथाइल सल्फेट (Dimethyl Sulphate) हे अत्यंत धोकादायक रासायनिक द्रव्य वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. मात्र, टँकरमधून कोणत्याही प्रकारची रासायनिक गळती न झाल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईकडे डायमिथाइल सल्फेट हे रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा टँकर चारोटी उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यावर उभा होता. यावेळी चालक टँकर मागे घेत असताना रस्त्याचा अचूक अंदाज न आल्याने टँकर अचानक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

Mumbai Ahmedabad Highway  Chemical Tanker Overturns
Palghar News | जव्हारमध्ये शेतकऱ्यांना खतटंचाईचा फटका; बियाणे घेतल्याशिवाय खतं देण्यास कृषी सेवा केंद्राचा नकार!

डायमिथाइल सल्फेट हे अत्यंत विषारी आणि धोकादायक औद्योगिक रसायन असल्याने सुरुवातीला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, टँकरची पाहणी केल्यानंतर त्यामधून कोणत्याही प्रकारची गळती झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मोठा अपघात आणि पर्यावरणीय धोका टळला.

घटनेची माहिती मिळताच कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमर पाटील तसेच चारोटी महामार्ग पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम पऱ्हाड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवून परिसर सुरक्षित केला.

Mumbai Ahmedabad Highway  Chemical Tanker Overturns
Palghar News : अखेर खोडाळा मंडळ कृषी अधिकाऱ्यांना आली जाग

त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला टँकर उचलण्याचे काम सुरू करण्यात आले. टँकर सुरक्षितपणे हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

धोकादायक रसायन वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. चालकाच्या सतर्कतेअभावी घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा रासायनिक गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news