

खोडाळा : दीपक गायकवाड
खोडाळा येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत मागील अनेक वर्षापासून विनावापर पडून आहे. आधीच जीर्ण झालेल्या इमारतीचा वापर नसल्याने जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरावस्थेत अधिकच भर पडत गेलेली आहे. ही इमारत केव्हाही कोसळून जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने सदर इमारत निष्काषीत करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे.
याबाबत वर्तमानपत्रामधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खोडाळा मंडळ कृषी अधिकाऱ्यांना जाग आली असून त्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना न करता केवळ सदर इमारत धोकादायक असल्याने या इमारती जवळ कोणीही जाऊ नये अशा आशयाचा फलक लावून आपली जबाबदारी झटकलेली आहे त्यामुळे परिसरातील जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रस्तुत इमारत धोकादायक असल्याने मंडळ कृषी अधिकारी कार्यालय सद्यस्थितीत दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले असून या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून खोडाळा विभागातील कास्तकारांचे काम पाहिले जात आहे. परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे दर्शन दुर्मिळ झालेले आहे क्वचित प्रसंगी एखादा कर्मचारी दिसून येतो तर मंडळ अधिकारी मात्र कायमस्वरूपी दिसून येत नाही.अशी येथील एकंदरीत परिस्थिती आहे.तर इतर कर्मचारी फिरस्ती कर्मचाऱ्यांच्या बॅनर खाली कार्यालयात येतात किंवा येतच नाहीत की आपल्या बीटमध्ये हजर असतात याबाबत कोणताच खुलासा होत नसल्याने एकूणच मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची अवस्था ही ऑलवेल असल्याची टिपणीही शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
खोडाळा मंडळ कृषी अधिकारी हे याबाबत तितकेसे गंभीर नसल्याने किंबहुना ते स्वतःच त्याबाबत त्याबाबत कमालीची चालढकल करत असल्याने कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात नसल्याचे चित्र असून त्यामुळे गरीब आदिवासी कास्तकारांना त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागत आहेत.याबाबत ठोस उपापययोजनां सोबतच गांभीर्याने याकडे लक्ष देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
शेतकर्यांमध्ये नाराजी
आधीच पावसाने कमालीचा विलंब केला असून मानसून पूर्व मशागत किंवा पेरणी, बियाणे, खते याबाबतचे मार्गदर्शन घेण्यासाठी शेतकरी येथे मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात परंतु येथे वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी मिळून येत नसल्याने शेतकऱ्यांना विन्मुख परतावे लागत असल्याने शेतकऱ्यांना शेतीबाबत हरी वर हवाला ठेवावा लागत आहे एकूणच मंडळ कृषी अधिकारी तसेच कृषी पर्यवेक्षक यांनी आपल्या कामकाजात सुधारणा न केल्यास त्यांना मोठ्या जनक्षोभाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र भविष्यात दिसणार आहे.