

खोडाळा ः मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम आणि शत प्रतिशत आदिवासी लोकवस्ती असलेल्या पोऱ्याचापाडा आणि परिसरातील रहिवाशांची जीवनवाहिनी असलेली पोऱ्याचापाडा येथील विहीर ऐन पाणी टंचाईत जमीनदोस्त झालेली आहे. येथील आणखी एका विहीरीचे पाणी एप्रिल मध्यापर्यंत पिण्यासाठी पुरेसे होते. मात्र त्यापुढील टंचाईत हीच एकमेव विहीर जीवन वाहीनीचे काम करत असते.तथापी हीच सर्वार्थाने वापरा योग्य असलेली विहीरच भुईसपाट झाल्याने ऐन पाणी टंचाईच्या भर हंगामात तहान भागवायची कशी..? हा यक्षप्रश्न येथील जनतेला पडलेला आहे.
मौजे पोऱ्याचापाडा आणि उधळे पैकी हट्टीपाडा येथील जनतेला या जीवंत विहीरीचा अनमोल उपयोग होत होता.या दोन्ही गावातील शेकडो लोकं याच विहीरीवर आपली तहान भागवत होती.माणसं आणि जनावरांना पिण्यासाठी आणि नैमित्तिक उपयोगासाठी या विहीरीच्या पाण्याचा सर्रास उपयोग केला जात होता.
येथील आणखी एका विहीरीचे पाणी एप्रील मध्यापर्यंत पुरते मात्र त्यानंतर या विहीरीचे पाणी आटते. त्यापुढे याच भुईसपाट झालेल्या विहीरीचा एकमेव ाद्वितीय आधार येथील जनतेला होता. तथापी मागील महिन्यात या विहीरीचा कठडाच तुटून थेट विहीरीतच गुडूप झाला असून आज मितीला ही विहीर जमीनीला समतल झालेली आहे. एकीकडे या भुईसपाट विहीरीमूळे टंचाईची दाहकता वाढणार असून दुसरीकडे मात्र ही विहीर सरावलेले जनावरं आणि आगंतुक व्यक्तींसाठी धोकादायक झालेली आहे.
गृप ग्रामपंचायत उधळे वाकडपाडा पैकी पोऱ्याचापाडा येथे ही विहीर असून तत्कालीन सरपंच मोहन गवारी यांच्या कार्यकाळात म्हणजेच अदमासे 15 वर्षांपूर्वी या विहिरीचे बांधकाम झालेले आहे.त्यानंतर दरम्यानच्या अवधीत या विहीरीची काडीमात्रही डागडुजी करण्यात आलेली नाही.पर्यायाने सदरच्या विहीरीचा कठडा कमकुवत झालेला होता.
सुदैवाने प्रस्तूत विहीर भुईसपाट होतांना उधळे हट्टीपाडा अथवा पोऱ्याचापाडा येथील कोणतीही गृहीणी किंवा जित्राब याठिकाणी हजर नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा तेही जमीनदोस्त झाले असते.असे येथील जनतेने सांगितले आहे.
सदर विहीरच्या कठड्याचे बांधकाम सिमेंट , दगड , वाळू आदी बांधकाम साहित्य वापरून करण्यात आले होते.या विहिरीची खोली जमिनी पासून 30 फूट भुगर्भात असून सदर विहिरीचे पाणी हे पिण्यासाठी वापरत असत. या विहीरीमूळे रहिवासी आणि जनावरे यांना जिवंत शुद्ध पाणी उपलब्ध होत होते. तसेच कपडे धुण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून याच पाण्याचा वापर केला जात होता.
पोऱ्याचापाडा गावचे लोकांना या मुबलक पाण्याचा उपयोग होत होता.तसाच तो हट्टीपाडा येथील लोकांना सुद्धा होत होता.परंतु जिल्हा परिषद प्रशासनाला त्याचा सोयीस्कर विसर पडला आहे.पर्यायाने असंख्य जनावरं आणि शेकडो रहिवासी त्यामुळे बाधीत होणार आहेत.तथापी त्याचे काडीमात्रही सोयरसुतक जिल्हा परिषद प्रशासनाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“असून अडचण नसून खोळंबा“
मौजे पोऱ्याचापाडा येथे हर घर नल योजनेतून जलजीवनची नळयोजना कार्यान्वित करण्यात आली आहे.परंतु अगदी जलकुंभाला खेटून असलेल्या घरालाही नळ योजना जोडण्यात आलेली नाही.तर इतर 40 घरांना पाणी पुरवठा करणारे नळाचे पाणीही 4-4 दिवसांनी पुरवठा केले जात आहे.त्यामुळे ही योजना येथील गावकऱ्यांसाठी “ असून अडचण, नसून खोळंबा झालेली आहे.