Shahapur Ashram school : शहापुरात आश्रमशाळांची परिस्थिती चिंताजनक
डोळखांब : शहापूर तालुक्यात आदिवासी तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी शासन करोडो रुपये खर्च करत असले तरी तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील आश्रमशाळांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सुरू असलेल्या तपासणी अहवालात स्पष्ट झाले असून याबाबत संबंधित यंत्रणेने लक्ष घालून परिस्थिती सुधारण्याची गरज असून याबाबत नुकतेच भिवंडी लोकसभेचे खा. बाळ्यामामा म्हात्रे यांचे चिरंजीव सुमित म्हात्रे यांनी नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची सदिच्छा भेट घेऊन निवेदन दिले आहे.
शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अंतर्गत भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ तालुक्यातील अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळांचा समावेश होतो. यापैकी अनुदानित आश्रमशाळा १३ तर शासकीय आश्रमशाळा २३ अशा ३६ आश्रमशाळांचा समावेश होतो. मात्र सद्यस्थितीत बहुतांशी आश्रमशाळांची परिस्थिती गंभीर असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे.
शहापूर तालुका हा अतिशय दुर्गम, डोंगराळ व पेसा अंतर्गत असलेला तालुका आहे. याठिकाणी शहापूर, अंबिवली, डोळखांब, शिरोळ, पेंढरघोळ, कोठारे, टाकिपठार, शेणवा, विहीगाव माळ सावरोली याठिकाणी मिळून शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा आहेत. या शाळांची उच्चस्तरीय तपासणी सुरू असून तालुक्यातील डोळखांब-सावरपाडा आश्रमशाळा याठिकाणी नाशिक येथील प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे यांनी नुकतीच भेट दिली.
यावेळी त्यांनी मुलींच्या हॉस्टेलकरिता सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असून विद्यार्थांना बॅड टच, गुड टच आवश्यकता, तसेच अंघोळीला गरम पाणी, आहारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे शेरे पुस्तकात नमूद केले आहे. त्यामुळे आश्रमशाळांकरिता आठ लेखाशिर्षाखाली खर्च करण्यात येणारा तातडीचा निधी नेमकी कुठे जातो, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
आश्रमशाळेविषयी सकारात्मक चर्चा
या पार्श्वभूमीवर सुमित म्हात्रे यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांची भेट घेऊन मतदार संघातील आश्रमशाळांविषयी सकारात्मक चर्चा केली. यावेळी शिक्षण व्यवस्थेसंबंधित गंभीर समस्यांवर चर्चा करून सकारात्मक पावले उचलण्याची विनंती केली. तसेच शाळांची दुरवस्था, जीर्ण इमारती, शिक्षकांची व महिला शिक्षकांची कमतरता, शैक्षणिक गुणवत्ता, निकृष्ट आहार आणि ठक्कर बाप्पा अंतर्गत आश्रमशाळा इमारतींची विविध ठिकाणी संथगतीने सुरू असलेल्या कामांची गती वाढणे व दर्जा सुधारण्यासाठी संबंधित व्यवस्थेला आदेश देण्याचे निवेदनही दिले असून या प्रकरणी सकारात्मक प्रतिसाद राज्यपाल यांनी दर्शविला आहे.

