

वाडा : राज्यात समस्यांनी शापित महामार्ग म्हणून ओळख असणाऱ्या मनोर - वाडा - भिवंडी रस्त्याची अवस्था कोट्यवधींचा निधी खर्चूनही गंभीर बनलेली आहे. जागोजागी अपूर्ण कामे डोकेदुखीचा विषय बनलेली असून पावसाळ्यात याचा सर्वाधिक फटका वाडा ते भिवंडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागण्याचा शक्यता आहे.
तुलनेत सुस्थितीत असणाऱ्या मनोर ते वाडा या मार्गाचे काम हाती घेण्या आधी वाडा ते भिवंडी मार्ग सुकर बनविण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे. कुडूस गावाजवळ खड्ड्यात रात्रीच्या सुमारास एक ट्रक पलटला असून अशा किती घटना अजून होणार आहेत असा सवाल विचारला जात आहे.
अंबाडी ते भिवंडी या महामार्गावर कामाचा पार बट्ट्याबोळ झाला असून या मार्गावर जागोजागी कामांचा पसारा जैसे थे असल्याने वाहनचालक बेजार आहेत. अंबाडी ते कुडूस या भागात काही पट्ट्यात काम पूर्ण झाले असले तरी अजूनही अपूर्ण काम धोकादायक अवस्थेत आहे. कुडूस जवळ काम पुढे सरकायला तयार नसून कोकाकोला, खिंडपाडा, ते खुपरी मार्गावरील खड्डे व धूळ नकोशी झाली आहे.
नेहरोली पुलाजवळ दुतर्फा कामाचा खेळखंडोबा झाला असून अनेक दिवसांपासून काम का रखडले आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिरीषपाडा गावाजवळील काम कासवगतीने सुरू असून वाड्यापर्यंत रस्ता जागोजागी अपूर्ण आहे.
वाडा ते टेननाका भागात खरेतर काहीच टप्प्यात रस्ता खराब होता मात्र वन विभागाच्या जागेतील अडचण दूर होत नसल्याने या मार्गावर काम हाती घेण्याची घाई का करण्यात आली असा लोकांचा सवाल आहे. पूर्ण महामार्गावर गटारांसह लहान पुलांची कामे अपूर्ण असून अनेक दिवसांपासून यात कोणताही बदल होताना दिसत नाही.
नाल्यात ट्रक फसला
कुडूस गावाजवळ गटाराला भगदाड पडल्याची घटना ताजी असताना वडवली गावाजवळ गटारावरून जाताना ट्रक थेट स्लॅब तोडून आत रुतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंत्राटदार कंपनी गटारांची कामे थातूरमातूर करीत असल्याचा आरोप पहिल्यापासून होत असताना या घटनेने त्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे स्थानिक सांगतात. रस्त्यावरील काँक्रिट देखील अनेक ठिकाणी दबले असून कोट्यवधींच्या या सर्व रस्त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.