

पालघर : मनोर पोलीस ठाण्याचे माजी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधात तोफखान पोलीस ठाणे अहिल्यानगर मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा मनोर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तर अहिल्यानगर येथील कॅम्प पोलिस ठाण्यात त्याच महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही व्यक्तीने एकमेकांविरोधात अहिल्यानगर मध्ये गुन्हे दाखल झाले असले तरी बलात्काराचा गुन्हा मनोर पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील पोलीस दलातील वातावरण तापले आहे.
पालघर जिल्ह्यात ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 काळात एका महिलेने आपल्याला लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले असल्याची तक्रार दाखल केली आहे. पालघर येथील मनोर तसेच मुंबईमधील जोगेश्वरी येथील हॉटेलवर संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भारतीय न्याय दंड संहिता 2023 अंतर्गत कलम 69 352 351 या कलमांतर्गत सुरुवातीला अहिल्यानगर येथील तोफखाना पोलिसांना शून्य क्रमांकाने हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे मात्र घडलेली घटना ही मनोर पोलिसांच्या हद्दीतील असल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण म्हणून पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.
या गुन्ह्याबाबत तपास अधिकारी प्रभा राऊळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माझ्याकडे केवळ कागदपत्रे आले आहेत. ह्या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने करण्यात येईल. समोर येणारे पुरावे आणि वस्तुस्थिती याचा तपास करून तपास करू असे त्यांनी सांगितले.
या उलट सदर महिलेने पोलीस अधिकारी यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती दिली नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले. खंडणी बाबत त्यांनी कायदेशीर फिर्याद अहिल्यानगर मधील कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. महिले विरोधात भारतीय न्याय दंड संहिता 308(2)308(6) व इतर कमलांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पैशाची मागणी केल्याची तक्रार
राज्यातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी यांना महिलेने पैश्यासाठी हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याचे प्रकरण ताजे असताना या प्रकारात देखील पैश्याची मागणी करण्यात आली असल्याचे समोर येत आहे. यामुळे पालघर पोलीस दलाच्या तपासाकडे सगळ्या लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.