

मुंबई : मुंबई महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. यामुळे प्रशासकाला वाटेल तसे निर्णय घेतले जात आहे. परिणामी मुंबई महापालिकेची उद्याने, मनोरंजन मैदाने आणि मोकळे भूखंड आदी देखभालीसाठी खासगी कंत्राटदारांना पुन्हा एकदा देण्यात येणार आहेत. पालिकेने त्यासाठी ई- टेंडर काढले आहेत. यामुळे पालिका प्रशासनात चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिकेची शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या ठिकाणी अनेक उद्याने, मनोरंजन मैदाने आणि मोकळे भूखंड असून ती उद्यान खात्याच्या अखत्यारीत आहेत. महापालिकेने शहराच्या नवीन विकास आराखड्यात सदर उद्याने, मोकळे भूखंड, क्रीडांगणे आदींसाठी प्रयोजन अगोदरच केले आहे.
यापूर्वी महापालिका उद्याने, क्रीडांगणे, मोकळे भूखंड हे देखभाल करण्यासाठी आणि त्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी तीन वर्षांसाठी अथवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी देत असे. मात्र मागील वर्षात त्यावर तत्कालीन महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती यांनी वेळोवेळी आक्षेप घेतले होते. यानंतर सदर देखभालीचा कालावधी कमी करण्यात आला होता.
महापालिकेची घाटकोपर, मुलुंड, भांडुप परिसरात 250 पर्यंत उद्याने, मनोरंजन मैदाने आहेत. ती सर्व खासगी कंत्राटदारांना यापूर्वी देखील देखभालीसाठी देण्यात आली होती.
आता मात्र अशी सर्व उद्याने ऑक्टोबर 2027 पर्यंत अर्थात दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहेत.
शहर भागातील परळ येथील 56 प्लॉट, दादर येथील 45 प्लॉट, प्रभादेवी येथील 54 प्लॉट आणि माटुंगा येथील 64 असे एकूण 219 प्लॉट खासगी कंत्राटदारांना देखभालीसाठी देण्यात येणार आहेत.
पश्चिम उपनगरांतील अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मालाड, गोरेगाव या ठिकाणी असलेली उद्याने, मनोरंजन मैदाने यासाठीचे भूखंडदेखील खासगी कंत्राटदारांना देखभालीसाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.