

तलासरी: गेल्या दोन दिवसांपासून तलासरी शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सीमेवरील गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नसल्याने तसेच पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याच्या चर्चेने, घाबरलेल्या नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पंपांवर एकच गर्दी केली आहे. विशेष म्हणजे पंप मालकांकडून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे वारंवार सांगण्यात येत असूनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवरील गुजरात राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर कालपासून पेट्रोल मिळत नसल्याने महाराष्ट्रात दाखल होत पेट्रोल पंपावर गर्दी करत लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तलासरी तालुक्यातील अच्छाड, काजळी, वरवाडा, तलासरी, वडोली येथील पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत.
दुचाकीसह चारचाकी वाहनांनी रस्ते व्यापले असून, यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील निर्माण होत आहे. तलासरीत दुपारच्या कडाक्याचा उन्हात नागरिक अर्धा ते एक तास रांगेत उभे राहून मोटर सायकल वाहनात फक्त 200 रुपयाचे पेट्रोल आणि चारचाकी वाहनांमध्ये 1000 रुपयाचे पेट्रोल दिले जात आहे. पुढील काही दिवस पेट्रोल मिळणार नाही, अशा स्वरूपाची चर्चा होत असल्याने ही भीती पसरल्याचे बोलले जात आहे.
पेट्रोल पंप मालकांनी स्पष्ट केले आहे की, इंधनाचा तुटवडा नाही आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, तरीही नागरिक घाबरून खरेदी करीत आहेत. यामुळे विनाकारण गर्दीचा ताण पेट्रोल पंप यंत्रणेवर येत आहे. महाराष्ट्र सीमेवरील गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नसल्याबाबत प्रशासनाने माहिती देत आवाहन केले आहे.
गुजरात मधील पेट्रोल पंपांवर निर्माण झालेली इंधन टंचाई ही कंपन्यांच्या पेमेंट पद्धतीतील बदल आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे झालेली तात्पुरती समस्या आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आधीच्या डिलिव्हरीनंतर पेमेंट ऐवजी आता ॲडव्हान्स पेमेंट प्रणाली अनिवार्य केली आहे.
यामुळे पेट्रोल पंप चालकांकडे रोख रकमेची चणचण निर्माण होऊन पुरवठ्याला विलंब होत आहे तसेच सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर इंधन संपणार असल्याच्या खोट्या अफवा पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली. यामुळे सामान्य दिवसांपेक्षा 4 ते 5 पटीने जास्त विक्री होऊन उपलब्ध साठा वेगाने संपला.
याबाबत गुजरात सरकारचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे की, राज्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. कंपन्यांकडून नियमितपणे टँकरद्वारे पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका: केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करा आणि अतिरिक्त साठा करणे टाळा, जेणेकरून पुरवठा साखळी लवकर पूर्ववत होईल.