El Nino monsoon impact: एल निनोचे सावट गडद; ठाणे जिल्ह्यात शेती संकटाची भीती

शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारा
El Nino monsoon impact
El Nino monsoon impactPudhari
Published on
Updated on

ठाणे: वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणारी ‌‘एल निनो‌’ परिस्थिती यंदाच्या मान्सूनवर परिणाम करू शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, त्याचा थेट फटका शेती क्षेत्राला बसण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषद कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करत वैज्ञानिक पद्धतीने शेती नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

‌‘एल निनो‌’ ही हवामानाशी संबंधित नैसर्गिक प्रक्रिया असून, प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा वाढल्याने वातावरणीय बदल घडतात. त्याचा परिणाम भारतातील नैऋत्य मान्सूनवर होतो. यामुळे पाऊस उशिरा सुरू होणे, पावसाचे प्रमाण कमी होणे, मधूनच पावसाचा मोठा खंड पडणे किंवा दुष्काळसदृश स्थिती निर्माण होणे अशा समस्या उद्भवू शकतात. परिणामी भातासह विविध खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा धोका वाढतो.

El Nino monsoon impact
Thane News: ठाणे महानगरपालिका महासभेत गदारोळ

विशेषतः ठाणे जिल्ह्यातील भातशेतीवर एल निनोचा मोठा परिणाम होऊ शकतो. वेळेवर पाऊस न झाल्यास पेरण्या रखडण्याची शक्यता असून, पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. पाण्याअभावी जमिनीतील ओलावा कमी होतो, त्यामुळे खतांचा परिणामही मर्यादित राहतो. फळबागा, भाजीपाला आणि मसाल्याच्या पिकांनाही याचा फटका बसू शकतो.

या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. कमी कालावधीत तयार होणाऱ्या आणि कमी पाण्यात तग धरणाऱ्या कर्जत-3 व रत्नागिरी-8 या भाताच्या वाणांची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किमान 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

El Nino monsoon impact
Crime News: महिलेची हत्या करणारा आरोपी अटकेत; प्रेमाला विरोध केल्याने केली होती हत्या

पाण्याची बचत करण्यासाठी एसआरटी आणि टोकण पद्धतीने भात लागवड, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर, डोंगर उतारांवर आडवी नांगरणी, समतल चर, शेततळे आणि बंधाऱ्यांद्वारे पावसाचे पाणी अडविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच फळबागांमध्ये प्लास्टिक आच्छादन आणि आंतरपीक पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना धैंचा या हिरवळीच्या खताच्या पिकाचे बियाणे तसेच तुरीचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहे. पावसाचा खंड पडल्यास एक टक्का युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

  • 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.

  • कर्जत-3, रत्नागिरी-8 अश्या कमी पाण्यात तग धरणाऱ्या वाणांची निवड करावी, ठिबक, तुषार सिंचन आणि एसआरटी पद्धतीचा वापर करावा.

  • शेततळे, बंधारे, समतल चर यांद्वारे पावसाचे पाणी साठवावे.

  • माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर करावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news