

खोडाळा : वनपरिक्षेत्र खोडाळा अंतर्गत कुर्लौद पैकी बोटोशी बिट नंबर 121 मध्ये वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा तयार केला. हा या वनपरिक्षेत्रातील चौथा वनराई बंधारा असून, वन्यजीवांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सदर ठिकाणी पाणी संथ गतीने वाहत होते. तेथे दगड, माती व स्थानिक साहित्याचा वापर करून वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविले गेले असून, तेथे नैसर्गिकरित्या पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. हे साठलेले पाणी आता वन्यजीवांना पिण्यासाठी सहज उपलब्ध होणार आहे. वनराई बंधारा हा केवळ पाणी अडविण्याचे साधन नाही, तर तो जंगलाच्या जीवनचक्राचा आधार आहे.
उन्हाळ्यात व दुष्काळात ओढे, नाले आटतात. त्यावेळी वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकू लागतात आणि अनेकदा मानवी वस्तीकडे येतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. वनराई बंधाऱ्यामुळे वनातच पाणी उपलब्ध राहते, त्यामुळे बिबट्या, सांबर, भेकर, रानडुक्कर, मोर, तसेच अनेक पक्षी व छोटे प्राणी यांना पाण्यासाठी भटकावे लागत नाही.
बंधाऱ्यात साठलेले पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे भूजल पातळी वाढते, आजूबाजूची झाडे-झुडपे हिरवी राहतात आणि परिसरातील जैवविविधता टिकून राहते. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविल्याने मातीची धूपही थांबते. एक छोटासा बंधारा संपूर्ण परिसराचे पर्यावरण संतुलित ठेवण्याचे काम करतो.विशेष म्हणजे हा बंधारा कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय, केवळ कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून उभारला आहे.
त्यामुळे श्रमदानाची परंपरा आणि वनसंवर्धनाची भावना यांचा उत्तम संगम येथे पाहायला मिळाला. खोडाळा वनक्षेत्रपाल शरण मिलींद देशपांडे,व कुर्लोद बिटचे वनपाल गणेश सुभाष कर्डीले यांच्या संकल्पनेतून व वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून हा बंधारा उभारण्यात आला.वन परिक्षेत्रामध्ये यापूर्वीही तीन बंधारे बांधण्यात आले असून, त्याचाही वन्यजीवांना मोठा फायदा होत आहे.दुष्काळात पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया, वन्यजीवांचे अस्तित्व टिकवूया! हा संदेश यानिमित्ताने वनविभागाने दिला आहे.
बिबट्याचा मानवी वस्तीकडे येण्याचा मार्ग थांबणार
बिबट्याला जर वनातच पाणी पिण्यास मिळाले, तर तो मानवी वस्तीकडे येणार नाही, हाच या उपक्रमामागील खरा उद्देश आहे. पाण्यासाठी बिबट्या गावाकडे आला की, गावात भीतीचे वातावरण निर्माण होते, पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडतात. वनातच पाण्याची सोय झाल्याने अशा घटना टाळता येणार असून, मानव आणि वन्यजीव दोघांनाही सुरक्षितता मिळणार आहे.