

जव्हार : आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी बेंगळुरू येथे शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून या दौऱ्याची विशेष बाब म्हणजे तब्बल 200 विद्यार्थ्यांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे. 24 मार्च रोजी 100 विद्यार्थी विमानाने बेंगळुरूकडे रवाना झाले आहेत, त्यानंतर 28 मार्च रोजी 100 विद्यार्थिनीदेखील अशाच प्रकारे प्रवास करणार आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानात बसण्यापूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना.
जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी अतिदुर्गम खेड्यांमधून येतात, काही ठिकाणी आजही नियमित बससेवाही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना थेट विमान प्रवासाचा अनुभव देण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नवीन जगाचा परिचय होत असून त्यांच्या मनात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण होत आहे. या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांना बेंगळुरू येथील सर विश्वेश्वरय्या संग्रहालय, एअरफोर्स म्युझियम, तसेच एचएएल म्युझियम आदी महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, तसेच त्यांच्यात या क्षेत्राबद्दल रुची निर्माण व्हावी, या उद्देशाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. विमानतळावरील प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक बाबींचीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख होणार आहे.
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड तसेच प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा ठरत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून आपणही काहीतरी मोठे करू शकतो ही भावना अधिक बळकट होणार आहे. भविष्यात पायलट, अभियंता किंवा अधिकारी होण्याची प्रेरणा या अनुभवातून मिळण्याची शक्यता आहे. तसेच पालक आणि समाजामध्येही शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार आहे, एकूणच आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला हा शैक्षणिक प्रवास उपक्रम त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरणार असून त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.