

पालघर : हनिफ शेख
सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार मध्ये विविध ठेकेदारांच्या केलेल्या कामांची अनामत रक्कम मोठ्या प्रमाणावर जमा होत असते.या खात्यातून तब्बल 111 कोटी 65 लाख रुपयांचा चेक स्टेट बँक ऑफ इंडिया जव्हार शाखेत पोहोचला मात्र या चेक बाबत बँक कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांना कळवल्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली आणि तब्बल 111 कोटी रुपये काढण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी आणि ठेकेदार यांचा प्रयत्न फसला.
आता या घटनेची तक्रार पोलिसात दिलेली असून या बाबतची अधिक चौकशी सुरू असल्याचे दिसून येत आहे यामुळे आता एवढी मोठी रक्कम काढण्याच्या या प्रक्रियेत नेमका कोणाचा सहभाग आहे हे समोर येणार आहे मात्र बँक अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही सतर्क अधिकाऱ्यांमुळे हा मोठा घोटाळा थांबला असला तरी जव्हार बांधकाम विभागाचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात ही कामे करताना ठेकेदारांकडून कामांची बिले देताना सिक्युरिटी म्हणून काही प्रमाणात अनामत रक्कम ही बांधकाम विभागाकडे जमा करण्यात येते ती कामानुसार 1टक्के 2 टक्के तर कधी 5 टक्क्यांपर्यंत जमा करून घेत असल्याचे दिसून येते आणि अनेक नवीन नियमानुसार तीन वर्षापर्यंत ही रक्कम काढता येत नाही. यामुळे तीन वर्षानंतर जमा असलेली आपली अनामत रक्कम काढण्यामध्ये काही अंशी ठेकेदार टाळाटाळ करत असतात किंवा काम करणारा ठेकेदारा वेगळा आणि एजन्सी वेगळी असते.याप्रकारामुळेही ही रक्कम जमा असते.
मात्र आता हीच जमा असलेली रक्कम जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून वेगळ्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.कारण बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्याने 111 कोटी 63 लाखाचा डीडी काढण्यासाठी चेक व आवश्यक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जमा केला आणि संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना इतक्या मोठ्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढण्याच्या या प्रयत्नाचा संशय आला यामुळे यांनी प्रत्यक्ष याबाबतची खातर जमा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात भेट दिली असता उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली तर संबंधित अधिकाऱ्यांनी हा चेक आपण दिला नसल्याचे सांगितले. तसेच इतक्या मोठ्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढू नये असे सूचित केल्याने बँक अधिकारी आणि जव्हार बांधकाम विभागाच्या काही कर्मचाऱ्यांमुळे हा गैरप्रकार टळला खरा मात्र यामुळे आता कुंपणच शेत खात असल्याची बाब समोर आली आहे.
या घटनेबाबत संशय कायम
मुळात अशी काम करणाऱ्या एजन्सीच्या नावाने ही अनामत रक्कम जमा होत असल्याने एजन्सी धारकाच्या परवानगीशिवाय अशी रक्कम काढणे शक्यच नसल्याने जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात झालेला हा गोंधळ नेमका याच रकमेबाबत झाला आहे का ? याबाबतही संशय व्यक्त होत असून यामध्ये पार्ट फाईव्ह नावाचा एक हेड असतो यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विविध कारणास्तव बिलातून कपात केलेली रक्कम दंडात्मक रक्कम अशा अनेक रकमा जमा असतात. याचा वेगळा हेड असल्याने हे पैसे अशा पद्धतीने काढणे या गोंधळामध्ये शक्य असू शकतात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार अनामत रकमेबाबत ही घटना घडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले जात असले तरी या घटनेच्या तपासानंतरच नेमकी कोणती रक्कम काढण्याचा प्रयत्न झाला हे समोर येणार आहे.