Jawhar Dhulai Andolan: जव्हारमध्ये धुलाई आंदोलनाला मोठे यश; 60 महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी

जव्हारमध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या धुलाई आंदोलनाला यश
Jawhar Dhulai Andolan
Jawhar Dhulai AndolanPudhari
Published on
Updated on

पालघर : जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर भूमीपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लक्षवेधी धुलाई आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल सात तास चाललेल्या या अभूतपूर्व संघर्षानंतर, प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, अचानक कामावरून कमी केलेल्या सर्व 60 स्थानिक महिला धुलाई कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे. तसेच, त्यांचे मागील सात ते आठ महिन्यांपासून थकीत असलेले वेतनही तातडीने अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेचे हे पहिलेच आंदोलन मात्र मिळालेले अनपेक्षित यश लक्षवेधी ठरले.

Jawhar Dhulai Andolan
Palghar News : बोईसरमध्ये सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओमुळे तणाव; आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

आश्रमशाळांमध्ये गेली 20 वर्षे सेवा देणाऱ्या या महिलांना प्रशासनाने आऊटसोर्सिंगचे कारण देत कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढले होते. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोमवारी राजीव गांधी मैदानापासून शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि महिलांच्या उपस्थितीत भव्य मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक, मुखात घोषणा आणि गाणी गात हा मोर्चा प्रकल्प कार्यालयावर धडकला.

प्रकल्प कार्यालयासमोर पोहोचताच, महिलांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे आणि चादरी तिथेच धुण्यास सुरुवात केली आणि धुलाई आंदोलनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशासनाला दाखवून दिले. एवढेच नव्हे, तर महिलांनी तिथेच चुली मांडून स्वयंपाक केला आणि सर्वांनी तिथेच जेवण करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. एकीकडे जव्हारमध्ये रणरणत्या उन्हात महिला रस्त्यावर उतरल्या असतानाच, दुसरीकडे या आंदोलनाची धग थेट मुंबईतील विधीमंडळात पोहोचली. विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सभागृहात तातडीने मांडला. यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तत्काळ दखल घेत सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले. एकीकडे रस्त्यावरील जनआंदोलन आणि दुसरीकडे विधीमंडळातून वाढलेला दबाव, यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर चक्रे वेगाने फिरली आणि प्रशासनाने या सर्व 60 महिलांना पुन्हा कामावर घेण्याचे आणि त्यांचे थकीत वेतन देण्याचे लेखी आश्वासन दिले.

Jawhar Dhulai Andolan
Vasai Virar Quarry Drowning:. वसई-विरारमध्ये खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू; उघड्या खदानींचा गंभीर धोका

आंदोलनस्थळी जेव्हा या मोठ्या यशाची आणि मागण्या मान्य झाल्याची घोषणा करण्यात आली, तेव्हा उपस्थित सर्व महिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. संघटनेमुळेच आम्ही ही लढाई जिंकलो, अशी भावना व्यक्त करत या कष्टकरी महिला भारावून गेल्या होत्या. यावेळी भूमीपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने आ. डॉ. मनीषा कायंदे यांचे जाहीर आभार मानण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व भूमीपुत्र एल्गार संघटनेचे सरचिटणीस नवनाथ भोये, कार्याध्यक्ष सुनील लोणे आणि अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केले. यावेळी गणेश माळी, रामा होला, स्वप्निल वाघ, विजय नडगे, मनोज पारधी, विकास धोडी, बाळाराम पाडोसा, मनोज धर्मावर, प्रसाद भालेराव, प्रणित उंबरसडा, दीपक पवार, स्वप्निल जाधव, विजय राऊत, भावेश पढेर, मकेलास पढेर, गोपाल भगत, सुभाष कामडी, राहुल पवार यांसह सरिता जाधव, प्रमिला तर्फे, चित्रा वाघ, करुणा मुकणे आदी महिला व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jawhar Dhulai Andolan
Eklavya Model Residential School: मोखाड्यातील एकलव्य निवासी शाळेच्या 32 कोटींच्या इमारतीवर प्रश्नचिन्ह; निकृष्ट कामाचा आरोप

आंदोलनाला मार्क्सवादी लेनिनवादी पार्टीचा पाठिंबा

या आंदोलनाला मार्क्सवादी लेनिनवादी पार्टीचे शेरू वाघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. भूमीपुत्र एल्गार संघटनेच्या जनहिताच्या प्रत्येक लढाईमध्ये आमचा पक्ष पूर्ण ताकदीने संघटनेच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिल्याने या आंदोलनाला अधिकच बळ मिळाले आणि प्रशासनावरील दबाव वाढण्यास मदत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news