

HSRP Number Plate
खानिवडे : वाहनधारकांना दिलेल्या मागील ३१ मार्च पर्यंतच्या तारखेनंतर पुन्हा मुदत वाढ दिलेली ३० जून ही दिलेली शेवटची तारीख असल्याने वाहनधारकांनी एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट त्वरित बसवुन घेण्याचे आवाहन पालघर जिल्ह्यातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई यांनी केले आहे. दिलेली उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणे हे भारतातील सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
यापूर्वी ३१ मार्च नंतर आता दिलेल्या मुदतीच्या ३० जूनला २० दिवस उरले आहेत. त्यात जर दिलेल्या मुदतीत ह्या नंबर प्लेट बसवता आल्या नाहीत तर तुमची आरटओत असणारी इतर कामेही होणार नाहीत. तसेच रस्ते तपासणीत साधी नंबरप्लेट दिसली तर प्रत्येक वेळेला एक हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाने ह्या नंबरप्लेट लागलीच बसविण्याचे आवाहन केले आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी दि. ३१ मार्च पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. नंतर ती मुदत ३० जून पर्यंत वाढविण्यात आली होती.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक वाहनधारकांकडून या मोहिमेस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे परिवहन विभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनावर नसेल, तर आरटीओतील कामेही होणार नाहीत.
येत्या १६ जून पासून एच एस आर पी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांची आरटीओतील काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व आरटीओ कार्यालयांना २ जून रोजी आदेश दिला आहे. यानुसार, १६ जूनपासून सदर नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांच्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वाहनावरील वित्त बोजा चढवणे वा उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी कामे थांबवली जाणार आहेत, परंतु, नंबर प्लेट बसवण्याची वेळ घेतल्याची पावती दाखवल्यास मात्र कामे केली जातील.
परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार, 'एचएसआरपी' नसलेल्या वाहनांची काही कामे थांबवली जाणार असली तरी जुन्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक काम व खासगी वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण केले जाणार असल्याचे आर टी ओ अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले आहे.
एचएसआरपी ही एक विशेष प्रकारची नोंदणी प्लेट आहे. जी अल्युमिनियमची बनलेली असते आणि तिच्यावर एक विशिष्ट क्रमांक कोड असतो. ही प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि चोरी रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी दिलेल्या मुदतीत वाहनांना एचएसआरपी प्लेट बसविण्याचे आवाहन वसई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे. आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील उप प्रादेशिक कार्यालयात ८२,९७८ वाहन धारकांनी एच एस आर पी नोंदणी केली आहे. मात्र त्यातील ६१२५५ नंबर प्लेट बसविल्या गेल्या आहेत.