

सातारा : शाळा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी केली जाते. स्कूल बस अथवा व्हॅन चालकाने दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र सातारा जिल्ह्यात अद्यापही कार्यवाही झाली नसल्याचे समोर आल्याने आरटीओचा उफराटा कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्कूल बस तपासणीकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. दि. 16 जूनपासून सर्वत्र शाळा सुरु होत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या स्कूल बस आणि व्हॅनची योग्य तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासन खडबडून जागे होते. त्यानंतर आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र दरवर्षी आरटीओचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच सातारा जिल्ह्यात अवैधरित्या स्कूल बस आणि व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
काही वेळा फक्त कागदोपत्री स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी केल्याचे दाखवले जात आहे. सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात तर सर्व सावळा गोंधळच असून तो आता चव्हाट्यावर आला आहे. शाळा, विद्यालये सुरू होण्यापूर्वी स्कूल बस आणि व्हॅनची फिटनेस तपासणी वेळेत होणार का? स्कूल बस आणि व्हॅन, रिक्षामधील विद्यार्थ्यांची कोंबा कोंबी थांबणार का? मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन होणार का? याबरोबरच आरटीओंची तपासणी आणि कारवाईत सातत्य राहणार का? असे विविध प्रश्न समोर येत आहेत.
अधिकारी व कर्मचार्यांना कार्यालयीन शिस्त नाही. कार्यालयात हम करे सो कायदा याप्रमाणे कामकाज सुरु आहे. वरिष्ठ अधिकार्यांना जिल्ह्यातील पदाधिकारी व नागरिक फोन करत असतात, मात्र त्यांना प्रतिसाद देणे, त्यांचे ऐकून घेणे हे देखील टाळले जात आहे. यापूर्वी असा प्रकार कधीही घडलेला नाही. सर्वसामान्य नागरिकांपासून वाहतूक संघटनांचे पदाधिकारी नेतेमंडळी यांनी कुठल्या तक्रारी केल्या तर त्याचे निरसन करण्याचे काम पूर्वीचे अधिकारी करत होते. मात्र आता सध्याच्या प्रशासनाने कानावर हात आणि तोंडावर बोट ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. चार मंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये आरटीओच्या अनुषंगाने अनेक प्रश्न सामान्य वाहनधारकांना सतावत आहेत. आता मंत्र्यांनीच या अधिकार्यांचे कान पिळून त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे, अशी सामान्य नागरिकांसह वाहनचालकांमधून मागणी होत आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरु आहे. मात्र स्कूल बस, व्हॅन व रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जादा मुले बसवली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये निट बसताही येत नाही. रिक्षामध्ये तर मुलांचे बॅग्ज, दप्तरे रिक्षा बाहेर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास हा धोकादायक रित्या होत असतो. नियमानुसार 7 लहान मुलांची वाहतूक करण्याचा नियम आहे. मात्र एकाच स्कूल बस, व्हॅन, रिक्षामध्ये 15 ते 20 मुलांची वाहतूक करण्यात येत असते. याकडे आरटीओसह शहर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यानेच शालेय विद्यार्थ्यांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.