HSRP Pune response
पुणे : शहरात वाहनांची सुरक्षा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आल्या असल्या तरी, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार वाहनधारकांचा याला थंड प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.
आत्तापर्यंत पुण्यात केवळ 1 लाख 61 हजार 310 वाहनांवरच या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. तर अजूनही तब्बल 23 लाखांहून अधिक वाहनांनी या नंबर प्लेट बसवल्या नसल्याचेही समोर आले आहे. लवकरात लवकर या नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन पुणे आरटीओकडून करण्यात आले आहे.
पुणे आरटीओ कोड (एमएच 12)
एकूण ऑर्डर्स - 4 लाख 24 हजार 718
दि. 08 मे 2025 पर्यंत अपॉइंटमेंट - 3 लाख 05 हजार 226
दि. 08 मे 2025 पर्यंत झालेले फिटमेंट - 1 लाख 61 हजार 310
पुणे आरटीओमध्ये 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या सुमारे 27.61 लाख आहे.
यापैकी केवळ 1.61 लाख वाहनांनीच आतापर्यंत या नंबर प्लेट्स बसवल्या आहेत.
जवळपास 26 लाख वाहने अजूनही प्लेट बसवण्यासाठी बाकी आहेत.
आरटीओने या प्लेट्स बसवण्यासाठी केंद्रे वाढवली आहेत आणि मुदतही वाढवली आहे.
तरीही, वाहनधारकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी दिसत आहे.
‘एचएसआरपी’ वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि चोरी तसेच, डुप्लिकेशन रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही नंबर प्लेट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अनिवार्य आहे. आम्ही वाहन मालकांना वारंवार आवाहन करत आहोत की, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित या नंबर प्लेट्स बसवून घ्याव्यात, अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे