

बोईसर ः आशिया खंडातील पहिला आणि सर्वात मोठा असा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आता पुन्हा एकदा अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद होणार आहे. प्रकल्पातील क्रमांक तीन हा 270 मेगावॅट क्षमतेचा युनिट मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या युनिटमधील वीज निर्मिती पुढील 60 दिवस पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या बंदामुळे महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांना वीजपुरवठ्यात 270 मेगावॅट विजेचा तुटवडा भासणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट क्रमांक तीन आणि चार हे प्रत्येकी 270 मेगावॅट क्षमतेचे असून, या दोन्ही युनिटमधून मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केली जाते. दर दोन वर्षांनी या युनिटपैकी एक युनिट अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद ठेवले जाते. यावर्षी युनिट क्रमांक तीनचे दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले असून, पुढील वर्षी युनिट क्रमांक चार दुरुस्तीकरिता बंद ठेवले जाणार आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य प्रबंधक अशोक शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,मंगळवार, दि. 4 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून युनिट क्रमांक तीनमधील वीज निर्मिती बंद करण्यात येणार आहे. हे युनिट अंतर्गत दुरुस्ती आणि देखभाल कार्यासाठी बंद ठेवले जाणार असून, सुमारे 60 दिवसांनी पुन्हा कार्यान्वित केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
1995 च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील प्रत्यक्ष वीज निर्मिती सन 2000 ते 2010 या कालावधीत सुरु करण्यात आली होती. त्यानंतर नियमितपणे दोन्ही युनिटचे तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीचे काम दर दोन वर्षांनी करण्यात येते.या निर्णयामुळे काही काळ राज्यात विजेच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. तथापि, ऊर्जा वितरण कंपन्यांकडून पर्यायी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे समजते.
थंडीच्या कालावधीत दुरुस्ती
दरम्यान, अणुऊर्जा प्रकल्पातील दुरुस्तीचे काम प्रामुख्याने थंडीच्या दिवसांत हाती घेतले जाते. कारण या काळात विजेचा वापर तुलनेने कमी असतो. नुकताच पावसाळा संपल्याने आणि नोव्हेंबरपासून थंडीचा प्रारंभ होत असल्याने प्रकल्प व्यवस्थापनाने हा कालावधी दुरुस्तीकरिता निवडला आहे.