

वाडा : वाडा-भिवंडी या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम मागील वर्षीपासून सुरू असून पावसाळ्यामुळे सध्या दुतर्फा गटारांची कामे जोमाने सुरू आहेत. अनेक महत्त्वाच्या नाक्यांवर गटारांची कामे पूर्ण झाली असली तरी या गटारांवर आता अवैध फेरीवाल्यांनी कब्जा मिळवल्याचे पहायला मिळत आहे. प्रशासन मात्र या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात असून तातडीने अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
वाडा ते अंबाडी दरम्यान सध्या काँक्रिटीकरणाचे काम, लहान मोठे पूल, मोऱ्या तसेच दुतर्फा सांडपाणी नियोजनाचे काम जोमाने सुरू आहे. वाडा शहरातील खंडेश्वरीनाका भागात गटारांची कामे पूर्ण झाली असून काम ओले आहे तोच त्यावर फळ विक्रेत्यांसह काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केली आहेत. वाडा शहरातील मुख्य रस्त्याची अवस्था अवैध अतिक्रमणांनी आधीच दयनीय झाली आहे. त्यामुळे महामार्गावर होत असणाऱ्या या अतिक्रमणांची प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
अवैध फेरीवाल्यांना अभय कुणाचे?
गटारांची कामे ओली असतानाच त्यावर फळ विक्रेत्यांनी कब्जा केल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते मात्र प्रशासनाने त्याकडे सपशेल डोळे झाक केली असून अवैध फेरीवाल्यांना नेमके बळ आहे तरी कुणाचे असा प्रश्न लोकांना पडला आहे. महामार्गाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी पूर्वीची अतिक्रमणे न काढता रस्त्याची लांबी कमी केली जात असल्याचा आरोप देखील केला जात असून याबाबत वाडा तहसीलदारांना पत्र देखील देण्यात आले आहे.