

डहाणू : विरेंद्र खाटा
तलासरी तडहाणू तालुक्यातील घोलवड गावात राज्यातील पहिले लोक इतिहास संग्रहालय उभारण्यात आले असून, लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि घोलवड ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने या संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे. नुकतेच या संग्रहालयाचे उद्घाटन सुप्रसिद्ध तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनानंतर कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री तसेच गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. घोलवड हे उत्तर कोकणातील महत्त्वाचे सागरी पर्यटन स्थळ असून चिकू, लिची, जांभूळ, स्टार फ्रूट यांसारख्या बागायती पिकांसह विविध शेती उत्पादनांसाठीही घोलवड प्रसिद्ध आहे.
येथे आदिवासी, मांगेला, माच्छी, बारी, वाडवळ, मराठी, जैन, माह्यावंशी, गुजराती, पारसी आदी विविध समुदायांचे वास्तव्य असून त्यांच्या लोकसंस्कृतीचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. तारपा व घोर हे पारंपारिक नृत्यप्रकार आजही येथे जिवंत आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील विविध चळवळींसाठीही घोलवडची ओळख राहिली आहे.
कृषी पर्यटनापासून ते स्पा सेवा देणाऱ्या हॉटेल्सपर्यंत विविध पर्यटनपूरक उपक्रमांची उभारणी येथे झाली आहे. नुकतेच राज्यातील तिसरे मधाचे गाव म्हणूनही घोलवडची ओळख निर्माण झाली आहे. या सर्व बाबींची दखल घेत एमटीडीसीकडून पर्यटनवाढीच्या अनुषंगाने मातीच्या रंगांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते, त्याचाच एक भाग म्हणून 145 वर्षांच्या जुन्या मराठी शाळेच्या इमारतीत राज्यातील पहिल्या लोक इतिहास संग्रहालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ही शाळेची वास्तू असल्याने परिसराला ऐतिहासिक आणि भारावलेले वातावरण लाभले आहे. इमारतीच्या भिंतींवर वारली चित्रकलेचा साज चढवण्यात आला असून, स्थानिक लोकसंस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या विविध वस्तू येथे मांडण्यात आल्या आहेत.